Tuesday, December 10, 2024
Homeशब्दगंधविषय किती सरळ आहे ना?

विषय किती सरळ आहे ना?

डॉ. शैलेंद्र गायकवाड

आपण जेवण बनवताना त्यासाठी लागणारे जिन्नस स्वच्छ करून मग अन्न शिजवतो. ताट-वाटी, चमचे एवढेच काय जेवणापूर्वी हातदेखील स्वच्छ करतो. रोज आंघोळ करतो. स्वच्छ कपडे घालतो. आपले राहते घर रोज स्वच्छ ठेवतो.

- Advertisement -

परंतु जरा कल्पना करा, हे सगळे आपण नाही केले तर काय होईल? नुसत्या कल्पनेने शिसारी येते ना?

मग मित्रांनो, आपण आपल्या शरीराइतकेच मौल्यवान असलेल्या मनाच्या स्वच्छतेकडे कधी बघणार? चिंता, विवंचना, काळजी, भीती, दुर्बलता, असुरक्षितता, राग, दुःख, ईर्षा, जळाऊपणा, क्रुरता, हिंसा, पलायन, स्पर्धा, खुनशीपणा, अविश्वास, हतबलता, निराशा, विकृत लैंगिकता, अपराध, अंधश्रद्धा, न्यूनगंड, अहंगंड, हीनता, तुलना, गर्व, फसवणूक, धास्ती, भ्रष्टाचार, चोरी, खोटेपणा, दांभिकता, आसक्ती, स्वार्थ, लाचारी, मजबुरी, व्यसनाधीनता, बंड, विध्वंस, वैफल्य, एकटेपण, दुर्लक्षित, गृहीत, तक्रार, गैरसमज, छळ, उपद्रव, आत्महत्या यांसारख्या असंख्य अव्यक्त; परंतु मनात साठून राहिलेल्या भावनांची यादी संपता संपत नाही.

बरे या भावनांचे वेळोवेळी निचरा झाला नाही तर संपूर्ण आयुष्य समस्याग्रस्त राहिल्याची असंख्य उदाहरणे आम्ही रोज बघतोय.

एकूणच काय तर मनातील समजूतदारी आणि संयम असा कुठे गेलाय आणि विध्वंसक भावना इतक्या साचल्यात की अप्रिय भावनेची एखादी ठिणगी पडण्याचा अवकाश की एकदम मोठा स्फोट होतोय आणि त्यातून सर्वत्र किती विचित्र गोष्टी घडताय. दुर्दैव असे की, आजकाल लोकं या भावनांना दाबण्यासाठीच किंवा विसरण्यासाठीच प्रयत्न करताना दिसतात. हे म्हणजे चिखलावर कापड किंवा पोते टाकून दुर्लक्षित करण्याचा प्रकार. मात्र त्याची लवकरच दलदल होते आणि ती सर्वांना गिळंकृत करते हे समजून घेण्याची आज कधी नव्हे ती गरज निर्माण झाली आहे.

मग आपल्या मनाची स्वच्छता करायची म्हणजे ती करायची तरी कशी? आजकाल बॉडी डिटॉक्स हा शब्द फार प्रचलित झालाय. बॉडी डिटॉक्स म्हणजे शरीरात गेलेल्या किंवा साचलेल्या विषद्रव्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया. हे पुढील पद्धतींनी होते. जसे शरीरात विषद्रव्य असलेले किंवा दोष निर्माण करणारे अन्नपदार्थ टाकणे बंद करणे. जाणीवपूर्वक सात्विक किंवा पौष्टिक आहार घेणे. तसेच ज्या जीवनशैलीमुळे शरीरात टॉक्झिन्स निर्माण होतात ती बदलणे, सुधारित जीवनशैली अंगिकारणे आणि सोबत आधीच शरीरात साचलेल्या विषद्रव्यांना बाहेर काढून टाकण्यासाठी उपाययोजना करणे. थोडक्यात, शरीरात दोषयुक्त अन्न गेले किंवा घातक पदार्थ गेले की शारीरिक आरोग्य ढासळते, रोग निर्माण होतात. याची जाणीव आणि जागृती जशी वाढली आहे तशीच माईंड डिटॉक्स किंवा इमोशनल डिटॉक्स करण्याची आज कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.

मित्रांनो, एक सर्वेक्षण असे सांगते की, आज दर पाच व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना चिंताग्रस्ततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

मग मनाला स्वच्छ आणि निरोगी ठेवणार तरी कसे?

सर्वात आधी दबलेले विकारी, लज्जास्पद किंवा संकोच निर्माण करणारे विचार, भावनांचा निचरा करणे. यासाठी योग्य आणि विश्वासू व्यक्तींजवळ मन मोकळे करायचे. खरेतर आपले पूर्वीचे कल्चरल मोड्यूल फार सुंदर आणि आदर्श होते. एकत्र कुटुंबपद्धती, नातेवाईकांमध्ये परस्परांप्रती प्रेम, विश्वास, परिसरातील लहान-मोठ्यांबद्दल आपलेपणाची, आदराची भावना, सामुदायिक पद्धतीने साजरे केले जाणारे सणसमारंभ.. या सर्व गोष्टींमुळे मुक्त आणि मनमोकळ्या संवादासाठी कोणी ना कोणी असायचेच. त्यामुळे नकारात्मक भावनांचा निचरा तर व्हायचाच परंतु चांगले मार्गदर्शन आणि आधारदेखील मिळायचा. आज खरेतर या सर्व गोष्टींचीच गरज आहे. मात्र ही मोठी प्रक्रिया आहे. तोपर्यंत आपण एकमेकांना जागृत करून मनमोकळ्या संवादाची आणि परस्परांप्रती विश्वास, आपलेपणाची भावना निर्माण करण्याची सुरुवात करायला हवी. मनाच्या स्वच्छतेसाठी हा सर्वात पहिला आणि महत्त्वपूर्ण उपाय. या उपायाचे केवळ व्यक्तिगतच मानसिक फायदे होतात असे नाही तर कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीदेखील मोठी मदत मिळू शकते.

मनाची स्वच्छता करण्याचा अजून एक उपाय म्हणजे आतमध्ये असलेल्या सर्व नकारात्मकतेच्या मुळापर्यंत जाणे आणि असे करता येणे शरीर स्वच्छ करण्याइतके सोपे आहे. मात्र त्यासाठी वेळ काढावाच लागेल. त्यासाठी स्वतःच्या सर्व विचार भावनांचे त्रयस्थपणाने अवलोकन करणे. जे दूषित विचार किंवा भावना आहेत त्यांना प्रामाणिकपणाने मान्य करणे आणि त्यांना सुधारित, चांगल्या विचारांमध्ये रूपांतरीत करणे. यासाठी वाचन, चिंतन, मनन, स्वसंवाद यांसारख्या अनेक पद्धती वापरता येतील. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो आणि मनाची स्वच्छता अबाधित ठेवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सजगता.

मित्रांनो, खरी समस्या ही आहे बाह्य जगाकडे आपण कधीच वास्तविक दृष्टीने बघत नाही. आपापल्या विचार, समजुती, धारणांच्या चष्म्यातूनच बघतो. त्यामुळे सत्य परिस्थितीचे आकलन न होता आपल्याच मनात असलेल्या समजुतींच्या अनुषंगाने अर्थ घेतला जातो. आपल्या समजुती जर टोकाच्या असतील तर परिस्थितीचे तसेच अर्थ आपल्या मनात जातात आणि गरज नसताना मनामध्ये नकारात्मकतेचे टॉक्झिन्स साचत राहतात. सजगतेच्या अभावानेच चांगली गोष्टदेखील वाईट अर्थाने मनात जाते.

मग सजगता म्हणजे काय? सजगता म्हणजे होश, भान.

स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा परिस्थितीबद्दल विचार करताना, अर्थ लावताना सजग राहणे. टोकाचा किंवा विकारी निष्कर्ष लावायच्या आधीच विवेकी अर्थ लावून मगच मनात स्वीकारणे. हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यामुळे स्वतःचा नक्की फायदाच होतो. कारण कोई सुने ना सुने, तुम्हारा मन तुम्ही सुन रहा है एवढे जरी नीट लक्षात ठेवले तरी सजगता टिकायला मदत होईल. तात्पर्य हेच की, जसे शरीरशुद्धीसाठी आपण जागृत झालो आहोत तसेच मनशुद्धीसाठी जागे व्हावे लागेल. कारण मानसिक समस्या, मानसिक ताणतणाव, त्यातून घडणारे अपप्रकार, गुन्हे, आत्महत्या आणि बिघडलेले कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य यांनी धोक्याची घंटा मोठ्याने वाजवायला सुरुवात केलेली आहे.

असे म्हणतात समस्येतच उपाय दडलेला असतो. ही धोक्याची घंटा नीट एकून त्याला संधीत रूपांतरीत केले तर आपण सर्वच पुन्हा ते प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, विश्वास, कर्तबगारी, प्रगती, सेवा, आनंद आणि शांती असलेले जीवन अनुभवू शकू, पुढच्या पिढीला ते भेट देऊ शकू. मला वाटते ही आपली जबाबदारी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या