पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी शहराजवळील बारावीच्या एका परीक्षा केंद्रामध्ये निलंबित नायब तहसीलदार चक्क स्वत:च्या मुलाला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर कडक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, या कॉपी प्रकारामुळे शिक्षण विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पाथर्डीच्या कॉपी पॅटर्नमुळे शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवेतून निलंबित असलेला नायब तहसीलदार अनिल तोरडमल याने पदाचा दुरूपयोग करून बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपी पुरवण्याचे काम केले असा आरोप होत आहे. गुरुवारी बारावीचा जीवशास्त्राचा (बायोलॉजी) पेपर पाथर्डी येथील तनपुरवाडीच्या परीक्षा केंद्रामध्ये सुरू होता. त्यावेळी तोडमल हा स्वतःच्या गळ्यात ओळखपत्र टाकून बसलेला होता. तोडमल याचा मुलगा या ठिकाणच्या परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देत आहे. वास्तविक परीक्षा केंद्रामध्ये शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षक व पेपर तपासणीसाठी असलेले भरारी, बैठे पथका व्यतिरिक्त कोणालाही परवानगी नाही. मात्र, नायब तहसीलदार तोरडमल सेवेतून निलंबन असतांना त्याच्या कोणतीही शासकीय जबाबदारी नसतांना पदाचा पदाचा दुरुपयोग करून त्याने शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तोडमल हा बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या मुलाला परीक्षेत फायदा मिळावा, म्हणून आपल्या पदाचा दुरुपयोग करून या परीक्षा केंद्रात वावतर होता. तो महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालून आपण कार्यरत अधिकारी आहेत, असे भासवून मुलाला कॉफी पुरवण्याचे काम करत असल्याचा आहे. तोडमल याच्यावर परीक्षा केंद्रामधील काही शिक्षकांना याचा संशय आल्याने याची पोलिस अधिकार्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकार्यांनी त्याची चौकशी केली. त्यात परीक्षा संदर्भात कोणतेही सरकारी काम नसताना निलंबित तहसीलदार हा मुलाला कॉपी पुरवण्यासाठी या ठिकाणी परीक्षा केंद्रात आढळून आल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर या निलंबित नायब तहसीलदारचे बिंग फुटले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे हे परीक्षा केंद्रामध्ये दाखल झाले. त्यांनी निलंबित तहसीलदार तोडमल याची कसून चौकशी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर माध्यम प्रतिनिधी परीक्षा केंद्राच्या आवारात गेले. त्यावेळी परीक्षा केंद्रावर कॉफी पुरवण्याचे काम सुरू होते. माध्यमाच्या प्रतिनिधींना पाहताच कॉपी पुरवणारी सर्व यंत्रांना ठप्प पडली. त्यानंतर आपल्या पाल्यांना कॉपी करता येणार नाही, याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी पत्रकारांना इथून काढा असे म्हणून गोंधळ सुरू केला. तोडमल हे निलंबित असताना गैरप्रकारे परीक्षा केंद्रांमध्ये येऊन कॉपी पुरवत असल्याने प्रशासनाकडून काही कारवाई होते याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, रात्री उशीरा याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पाथर्डी कॉपीप्रकरणी प्रांताधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आवश्यकतेनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. दरम्यान संबंधीत अधिकारी निलंबीत नायब तहसीलदार असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रावर संशयास्पद उपस्थिती गुन्हा दाखल
12 वी परीक्षा काळात अधिकृत कामगिरीवर नसतानाही पाथर्डी तालुक्यातील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय, तनपुरवाडी येथे 12 वी जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान एक संशयास्पद व्यक्ती आढळल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या व्यक्तीने नायब तहसीलदार असल्याचा दावा करत परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवला. मात्र, याबाबत केंद्र संचालक शिवाजी अंबादास दळे यांनी संशय बळावल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अनिल फक्कडराव तोरडमल असे संशयास्पद आढळून आलेल्या व्यक्तिचे नाव असून त्याच्यावर अनधिकृत प्रवेश मिळवून परीक्षा केंद्रावर थांबणे व परीक्षेच्या संहितेचे उल्लंघन करणे यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि महाराष्ट्रा विद्यापिठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरूवारी (27 फेब्रुवारी) घडला. दरम्यान तोरडमल हा दि. 11 फेब्रुवारी रोजीच्या पहिल्या पेपरवेळीही तो परीक्षा केंद्रावर आढळून आला होता. त्यावेळी देखील त्याने स्वतः नायब तहसीलदार असल्याचे सांगितले व अधिकार्यांसमोर आपले आयडी कार्ड सादर केले. परीक्षा केंद्रावर निरीक्षणासाठी जिल्हा व तालुका पातळीवरील विविध पथके येत असतात, त्यामुळे तो अधिकृत पथकातील असावा असे समजून त्याच्याकडे अधिक लक्ष दिले गेले नाही. मात्र, गुरुवारी त्याच्या उपस्थितीबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर तो कोणत्याही अधिकृत कामगिरीवर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्र संचालक दळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.