पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) आणि इयत्ता १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रकटनानुसार, १२ वीची मुख्य लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून तर १० वीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या दोन्ही परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा सोमवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२७ ते मंगळवार, दि. १६ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. दुसरीकडे, इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा सोमवार, दि. १५ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, दि. ११ मार्च २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे.
डॉ. मनिषा जेजूरकर आत्महत्या प्रकरण: संशयित डॉ. जेजुरकर यांना आत्मसमर्पणाचे निर्देश
मुख्य लेखी परीक्षेपूर्वी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांच्या तारखांचा कालावधीदेखील शिक्षण मंडळाने स्पष्ट केला आहे. यानुसार, इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, दि. २० जानेवारी २०२७ ते शनिवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडतील. तसेच, इयत्ता १० वीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, दि. २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, दि. १३ फेब्रुवारी २०२७ या काळात आयोजित केल्या जातील.
या परीक्षांच्या संभाव्य तारखा शैक्षणिक वर्ष चालू असतानाच आणि पुरेशा आधी जाहीर करण्यामागे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांना अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, तसेच परीक्षेच्या संभाव्य तारखा पूर्वकल्पना म्हणून उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा ताणतणाव कमी व्हावा, या हेतूने हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची पूर्वतयारी करण्यासाठी आणि वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य तारखा असून, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केले जाईल.




