सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यास नकार
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या वैद्यकीय जगताला हादरवून सोडणाऱ्या डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात त्यांचे पती तथा जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर डॉ. जेजुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, प्रकरणाची गांभीर्यता, मेरीट आणि अर्जाची पार्श्वभूमी विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्विकारण्यासच नकार दिला. याचिका न स्विकारता डॉ. जेजुरकर यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण (सरेंडर) करण्याचे निर्देश दिले आहेत.
Malegaon News: आठ दिवसात भुमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे शासनासह नगरसचिव-पोलिसांना आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर डॉ. जेजुरकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, त्यांची अटक अटळ मानली जात आहे. त्यामुळे डॉ. जेजुरकर स्वतःहून पोलिसांसमोर सरेंडर होतात की गंगापूर पोलीस त्यांना बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या प्रकरणात डॉ. नीलेश यांची एका महिला डॉक्टरसोबत अनैतिक ओळख असल्याचा आरोप आहे. यातूनच डॉ. मनीषा याना सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात होती, असा दावा फिर्यादीत आहे. जानेवारी २०२६ मध्ये संशयित नीलेश यांच्या डॉक्टर मैत्रिणीने डॉ. मनीषा यांना फोन करून तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, असे म्हणत हीन वागणूक दिली होती. त्यानंतर एका विवाह सोहळ्यात फोटो काढण्यावरून डॉ. मनीषा यांचा अपमान करण्यात आला होता.





