श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गावात दारू पिण्यासाठी जाण्यास मज्जाव केल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची हत्या केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. याबाबत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (राहणार कौठा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांची बहिण सुशिला शिवनाथ भवर(वय 32) राहाणार कारेगाव, ता. श्रीरामपूर हिने 18 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास तिचा पती शिवनाथ कारभारी भवर हा गावात दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाला असता तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून त्याने तिच्या अंगावरून ट्रॅक्टर घातला. त्यात तिचा दर्दैवी मृत्यू झाला.
या फिर्यादीवरून शिवनाथ कारभारी भवर याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी करत आहे.