अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पत्नीचा निघृण खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यास एक हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय ३८, रा. आंबी स्टोर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल एम. घोडके यांनी युक्तिवाद केला.
ही घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास देवळाली प्रवरा येथे आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. बाबासाहेब गोलवड यास दारू पिण्याचे व्यसन होते. त्याची पत्नी शितल गोलवड ही मजुरी करून घरखर्च भागवीत असे. आरोपी वारंवार पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत असे. घटनेच्या रात्री शितल हिने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला आणि लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर व कपाळावर वार करून तिचा जागीच खून केला. ही भीषण घटना आरोपीचा मुलगा स्वप्निल गोलवड याने प्रत्यक्ष पाहिली. मुलांच्या आरडाओरडीनंतर शेजारी धावत आले, मात्र आरोपी पळून गेला. या प्रकरणी विजय एकनाथ बर्डे (रा. सडे, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात फिर्यादी, पंच, आरोपीचा मुलगा, स्थानिक नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी या साक्षीदारांच्या ठोस साक्षी व पुराव्यांवर आधारित युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे मान्य केले. जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पक्षातर्फे अॅड. घोडके यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार मुख्तार कुरेशी, सीमा रजपूत, योगेश वाघ यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.




