नाशिक | प्रतिनिधी
पोलीसाकडे खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात सराईत खासगी सावकार संशयित कैलास मैंद याला शुक्रवारी अटक करून गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात चौकशीसाठी आणल्यानंतर त्याची पोलीस पत्नी संशयित सारिका मेंद-पवार हिच्यासह साथीदारांनी कार्यालयाबाहेर धिंगाणा घातला.
शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून दमदाटी करत अंमलदारांच्या अंगावर धावून जात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. आता तिच्यासह सात जणांवर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद असून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. कैलासच्या खासगी सावकारीत काही अंमलदारांच्याही पैशांचा हातभार असल्याची चर्चा आहे. जलद प्रतिसाद पथकातील (क्यूआरटी) अंमलदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सारिका सुभाष पवार ऊर्फ सारिका कैलास मैद हिच्यासह प्रशांत श्रीकृष्ण गारमोरे, दीपक दत्तू किरवे (सर्व रा. जेलरोड), रवी जाधव, अजय पाटील, नितीन परदेशी, देवा सिसोदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
कैलास मैंद याला उपनगर पोलिसांनी अटक करून सखोल चौकशीकरता गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात हजर केले, त्यावेळी तेथे पोहोचून सारिकाने माझा नवरा कैलास याला कायद्याने परवानगी नसताना इथे आणले, असा दावा केला. कायदेशीर चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यावर मी त्याची कोठेही चौकशी करू देणार नाही, असे म्हणत इतर साथीदारांना आवाज देत बोलावून घेतले.
सर्वजण कार्यालयाबाहेर आरडाओरडा करून गोंधळ घालत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. तेव्हा मीदेखील पोलीस आहे, तुझी आणि तुझ्या एसीपी, डीसीपीच्या मी नोकऱ्या खाते, असे नाही झाले तर माझे नाव लावणार नाही, असे म्हणत क्यूआरटीच्या अंमलदाराला धमकावले. तसेच कैलासला सोडले नाही तर आत्महत्या करेल असे म्हणत महिला अंमलदारांच्या अंगावर चाल केली. त्यानंतर महिला पोलिसांसह क्यूआरटीने तिच्यासह साथीदारांना विळखा घालत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर सर्वजण पसार झाले.
आयुक्तांनी खडसावले तेव्हाच अटक
संशयित कैलास मैंदविरुद्ध सन २०१० मध्ये पुणे शहरातील लेणी काळभोर व खडकी तर सन २०१८ मध्ये उपनगर वासह सन २०२५ मध्ये उपनगर पोलिसांत तीन असे एकूण सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. तरीही त्याला स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेमार्फत अटक होत नव्हती. एका प्रकरणात उपनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह अंमलदाराचे निलंबनही झाले होते. पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना खडसावल्याचे कळते. एखाद्या गुन्हेगाराला किती दिवस पळ काढू देणार, असे म्हणत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केल्याने आता गुन्हा दाखल होताच तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करून कैलासला अटक करण्यात आली.
निलंबनाची शक्यता
संशयित सारिका ही सन २००६ पासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून, आडगाव पोलीस मुख्यालयात आता जनरल ड्युटीसाठी नेमणुकीस आहे. तिच्याकडे काही महिन्यापूर्वी मुख्यालयातील महिला अंमलदारांना नेमण्यासाठी हजेरी मास्तरचे काम होते. त्यावेळीही तिने बरेच कारनामे केल्याची कुजबूज आहे. अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आवाजात, उद्धटपणे बोलण्याचे प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे अहवाल मिळताच तिच्याविरुद्ध खात्यांतर्गत शिस्तभंग, निलंबन किंवा इतर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




