दिल्ली । Delhi
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने अलीकडेच चंद्र मोहीमेचा भाग म्हणून चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. चांद्रयान-३ ने आता पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचं अंतर व्यापलं असून चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) याबाबतची पुष्टी केली आहे.
काल सायंकाळी सातच्या सुमारास चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. दरम्यान चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत पोहोचताच त्याने इस्त्रोला खास मेसेज पाठवला. “MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling iunar gravity.” असा संदेश यानाने पाठवला. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (mox), ISTRAC, बंगळुरू, हे चांद्रयान-३ आहे. मला चंद्र गुरुत्वाकर्षण जाणवत आहे. असं या संदेशात म्हटलं आहे.
चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला असून पुढील ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन रविवारी रात्री ११ वाजता होईल. हे यान चंद्राच्या १०० किमी वर्तुळाकार कक्षेत असून चंद्राच्या जवळ आणण्यासाठी आणखी चार ऑर्बिट रिडक्शन ऑपरेशन केले जातील. दरम्यान हे यान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ केले जाणार आहे.
चांद्रयान-३ ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. या मोहिमेसाठी ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अत्यंत परिश्रम घेऊन इसरोने हे मिशन तयार केलं होतं. त्याला मिळालेलं यश हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. १४ जुलै रोजी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. या यानाच्या सफरीचे अजून १८ दिवस बाकी आहेत. हे १८ दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असल्याचं सांगितलं जातं.