मुंबई | Mumbai
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वन कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी केली आहे. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगीरी व्यक्त करत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
मी दिलगिरी व्यक्त करतो
मी दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती नाही की, त्या भगिनी कोण आहेत? मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवणाला बसतो, जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे, असे भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यावरून सुरू असलेल्या टीकेवर बोलताना गिरीश महाजन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
मला खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी पुढाकार घेतो. नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षांत एकदाही असे केले नाही. मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे, असेही ते म्हणाले.
India EU FTA Trade Deal: भारत युरोपियन युनियन यांच्यात मोठा करार; मदर ऑफ ऑल डीलची घोषणा होणार
दरम्यान, गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे.




