नाशिक | प्रतिनिधी
अंगठ्या खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३५ ग्रॅम वजनाच्या १२ सोन्याच्या अंगठ्या असलेला ट्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. जत्रा हॉटेल ते नांदूर नाका लिंक रोडवरील आर्या आर्या ज्वेलर्समध्ये रविवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच संधीचा फायदा घेत चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे सोन्याच्या अंगठ्या पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानातील कर्मचारी आणि मालक अंगठ्या दाखवण्यात व्यस्त असताना संशयितांनी नजर चुकवून १२ अंगठ्यांचा ट्रे लंपास केला. चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला; मात्र दोघेही कारमधून पसार झाले.
आगीचा भडका आणि धुराचे लोट’ क्षणार्धात कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, नेमकं काय घडलं?
नंबर प्लेटचा अर्धा भाग गायब
संशयितांनी चोरीसाठी युंदाई ऑरा कारचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाची ओळख पटू नये, यासाठी एमएच ०२ पासिंग असलेल्या नंबर प्लेटचा अर्धा भाग तोडण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान आहे.
व्यापारी धास्तावले
जत्रा हॉटेल, समर्थनगर, इच्छामणीनगर आणि कोणार्कनगर परिसरात अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांच्या चोरीनंतर आता सराफा दुकानाला लक्ष्य करण्यात आल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव काळे पुढील तपास करीत आहेत.




