मुंबई | Mumbai
अभिनेत्री, निर्मात्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यातील वाद आता अधिक चिघळला आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर आधारित कथित चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेल्या वादात रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दीपाली सय्यद यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला मानसिक त्रास दिला जात असून, आपले काम थांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी आज पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटातील कोणतेही पात्र रुपाली चाकणकर यांचे आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. तरीही रुपाली चाकणकर या हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म स्टेकहोल्डर्सवर दबाव टाकत आहेत. पण काही झाले तरी चित्रपट प्रदर्शित होणारच. कारण जेव्हा अडचणी येतात, तेव्हा काही गोष्टी फुलतात, असे दिपाली सय्यद यांनी म्हटले.
नेमका वाद काय आहे?
अशोक खरात यांच्याशी संबंधित चित्रपटाच्या टीझर आणि त्यातील आशयावरून हा वाद सुरू झाला आहे. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दिपाली सय्यद यांच्यासह काही जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
चाकणकर यांच्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर आपल्याबद्दल अश्लील आणि अपमानास्पद स्वरूपाच्या पोस्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडीओंचा वापर करून आपल्यावर आरोप करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मी काय बदनामी केली हे त्यांनी सांगावे
आम्ही जो ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपट करत आहोत, त्यामध्ये मी कुठेही म्हटलेलं नाही की, या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा रोल आहे. रूपाली चाकणकर स्वतः तो रोल त्यांचा आहे, हे सांगून आपल्यावर हे सगळं ओढवून घेत आहेत. त्यांना मी आतापर्यंत आदराने उत्तर दिलेले आहे. त्यांना जर वाटत असेल तर त्यांना ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपट माझा पूर्ण झाल्यावर तो दाखवू. रूपाली चाकणकर यांनी बदनामीचा 25 कोटीचा दावा माझ्यावर टाकला. आम्ही आता नोटीस पाठवली आहे आणि 500 कोटींचा दावा रूपाली चाकणकर यांच्यावर टाकला आहे. त्या माझी बदनामी करत आहेत. रुपाली चाकणकर यांची मी काय बदनामी केली? हे त्यांनी सांगावे. असे दिपाली सय्यद यांनी म्हटले.
मी कुठल्याही अश्लील पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या नाही
रूपाली चाकणकर यांच्यासंदर्भात मी कुठल्याही अश्लील पोस्ट सोशल मीडियावर टाकलेल्या नाहीत. मी फक्त माझं टीजर पोस्ट केले. तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी तुम्ही आता करत आहात. दुसरं टीजर आल्यानंतरच तुम्ही गुन्हा दाखल केला. माझा उदरनिर्वाह या चित्रपटावर आहे, मी कलाकार आहे, मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत, असे दिपाली सय्यद यांनी म्हटले.
‘अजितदादांची आठवण येते’
या वादाच्या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही आठवण काढली. “मला आता अजितदादांची आठवण येत आहे. ते असते तर त्यांनी असं करू दिलं नसतं,” असे त्या म्हणाल्या. तसेच रुपाली चाकणकर या पूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या, त्यामुळे त्यांनी त्यावेळी काही भूमिका घ्यायला हवी होती, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.




