शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत करण्याची नवपरंपरा अलीकडच्या काळात रुजलेली आढळते. यावर्षीही अनेक ठिकाणी अभिनव पद्धतीने मुलांचे स्वागत करण्यात आले. ट्रॅक्टर, बैलगाडीतून मुलांची मिरवणूकदेखील काढली गेली. बहुसंख्य शाळांमध्ये गुलाबपुष्प आणि खाऊ देण्यात आला. सुट्टी संपवून शाळेत येण्यासाठी अनेक मुले नाखूष असणे अत्यंत स्वाभाविक आहे, पण अशा स्वागत उपक्रमामुळे त्यांच्या चेहर्यावर नक्कीच हसू उमलले असणार.
घरचे उबदार आणि सुखदायी वातावरण सोडून लहान मुलांना शाळेत जायचे नसते. या वयात शाळा आवडणारी मुले विरळाच. तथापि आवडो वा ना आवडो शाळेत जावेच लागते. हा प्रवास सुखकर करण्याचा प्रयास म्हणून अशा उपक्रमांकडे पाहिले जाऊ शकेल का? तथापि मुलांच्या विषयीचे ममत्त्व व आपुलकी शाळेच्या पहिल्या दिवसापुरती मर्यादित राहू नये, अशीच पालकांची अपेक्षा असणार. कारण नकळत्या वयात मुलांच्या मनावर शाळेचा प्रभाव सकारात्मक पद्धतीने पडला तर त्याचे ठसे कायमचे उमटतात. या वयात झालेले मूल्यसंस्कार आणि शिष्टाचार मुलांना आयुष्यभर सोबत करतात. बोलायचे कसे, वागायचे कसे, स्वच्छता, टापटीप याचे धडे या वयात गिरवले जाऊ शकतील.
डबा पूर्ण खाण्याच्या सवयीतून अन्नाचा आदर करणे मुले शिकू शकतील. सामाजिक बांधिलकी वा सामाजिक भान या शब्दांचे आकलन या वयात होत नाही. तथापि त्यांचे व्यावहारिक अर्थ मुलांना उपक्रमांच्या आणि खेळांच्या माध्यमातून शिकवले गेले तर ते त्यांच्या उत्तम नागरिकत्वाच्या दिशेने टाकलेले ते पहिले पाऊल ठरू शकेल. अशा वातावरणात मुले आपोआप खुलतील आणि मोकळी होतील. शिक्षकांप्रती आदराची भावना निर्माण व्हायला याची मदत होऊ शकेल. अनेक सरकारी शाळांमधील शिक्षक सर्जनशील आहेत ही समाजाच्या दृष्टीने आनंदाची बाब ठरावी. ते त्यांच्या कामाकडे फक्त पेशा म्हणून पाहत नाहीत.
शिकवण्यावर त्यांचे प्रेम व आवड असते. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे यासाठी ते झटतात. चौकटीबाहेरचा दृष्टिकोन हे अशांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असते. त्यांच्यामुळे मुलांच्या मनात ‘मज आवडते ही मनापासूनी शाळा; लाविते लळा ही जशी माऊली बाळा’ अशी भावना आपोआपच निर्माण होऊ शकेल. मुलांना आवडणार्या अशा शिक्षकांची संख्या वाढायला हवी. तो वारसा पुढे जायला हवा. सुजाण नागरिकांमुळे राष्ट्र घडते आणि बलिष्ठ होते हेच खरे.