जालना | Jalna
गेल्या १७ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यामधील (Ambad Taluka) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण (Hunger Strike) सुरू होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे पाटील यांचे उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. मात्र, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्सा देखील सांगितला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले की, मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणासाठी भूमिका स्पष्ट आहे. ते समाजासाठी लढत असून यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही फायदा नाही. मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे, मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत, त्यामुळे रद्द झालेले आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सरकारने याआधी मराठा समाजाला आरक्षण १६ आणि १७ टक्के दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयात कायदा केला आणि ते आरक्षण रद्द झाले. जेव्हा आरक्षण रद्द झाले त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचे धाडसं आम्ही केले. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचे काम आम्ही केले. पण रद्द झालेले आरक्षण आपल्याला मिळाले पाहिजे अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असून कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घडलेला एक किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. त्यामुळे तुमचे आंदोलन सर्वांपर्यंत पोहोचले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही. मराठा समाज आणि सरकार काही वेगळे नाही. त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचे मी ठरवले होते. मी परवा दिल्लीत गेलो होतो. तिथेही मला विचारण्यात आले, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता है.. तर म्हणाले, उसने तो सबको हिला के रख दिया है”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, यावेळी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा एक सदस्य द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पुढे ते म्हणाले की,”मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या कसा मागास आहे. या सगळ्या गोष्टी ते तपासत आहेत. मी त्यांना सांगितले की तुमचा एक माणूस त्या कमिटीत दिला तर अधिक फायदा होईल”, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले.