Thursday, September 19, 2024
Homeनगरनगर जिल्हा रुग्णालयाकडून पूजा खेडकरांना दोन दिव्यांग प्रमाणपत्र

नगर जिल्हा रुग्णालयाकडून पूजा खेडकरांना दोन दिव्यांग प्रमाणपत्र

अभिलेख तपासणीत बाब समोर प्रशासन घेणार आढावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या (मूळ राहणार ता. पाथर्डी, जिल्हा नगर) दिव्यांग प्रमाणपत्रबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान खेडकर यांना डोळे आणि मानसिक आजाराचे अपंगत्व प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा रुग्णालयातून देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाने केलेल्या अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्राचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

दरम्यान, खेडकर यांच्याबाबत अथवा त्यांच्या प्रमाणपत्राच्या तपासणीबाबत राज्य अथवा केंद्र सरकारच्यावतीने कोणतेही आदेश आलेले नाही. मात्र, प्रशासन त्यांच्या पातळीवर खेडकर प्रकरणाची आवश्यक असणारी माहिती, त्यांच्या प्रमाणपत्रासह अन्य माहिती संकलित करण्यात व्यस्त असल्याचे सुत्रांनी सांगितले. यावरून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी खेडकर यांच्याबाबत प्रशासन सर्तक झाले आहे. पूजा यांना डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय

मंडळांच्या तिन डॉक्टरांनी खेडकर यांची तपासणी आणि निरिक्षण करून हे प्रमाणपत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.घोगरे यांनी सांगितले आहेत. पूजा खेडकरचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाली आहे. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती झाली होती.

खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दररोज खेडकर आणि त्यांच्या कुटूंबाविषयी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने खेडकर यांच्याविषयी असणारी सर्व माहितीचे संकलन सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयाने त्यांना डोळे आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र मंजूर केल्यानंतर त्याचे वितरण ऑनलाईन पध्दतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने वितरण केले असल्याचे समाज विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

डॉक्टरांमागे चौकशीचा ससेमिरा
जिल्हा रुग्णालयात कोणतेही अपंग प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या 3 डॉक्टरांचे पॅनल असते. हे पॅनल संबंधीत रुग्णांची तपासणी करून त्यांच्या हालचालीनूसार त्याला असणार्‍या अपंगत्वाचे प्रमाण ठरवत असते. डॉक्टरांचे एकमत झाल्यावर संबंधीत रुग्णांचे अपंगत्व मान्य करण्यात येते. त्यानूसार पूजा खेडकर यांचे अपंगत्व मान्य करणारे, ते तपासणार्‍या तत्कालीन डॉक्टरांच्या पॅनलची चौकशी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

तत्कालीन शल्य चिकित्सकांची चौकशी व्हावी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातुन पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलंय. त्यामुळे अहमदनगरच्या या जिल्हा रुग्णालयांतील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या