Friday, November 15, 2024
Homeनगरपूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

गोपनियतेचे कारण पुढे करत बोलण्यास प्रशासनाचा नकार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या विविध प्रमाणपत्रासंदर्भातील चौकशी अहवाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विभागीय आयुक्त (नाशिक) प्रवीण गेडाम यांना सादर केला, मात्र या अहवालात काय नमूद केले आहे, याची माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला. अहवाल गोपनीय असल्याचा दावा त्यांनी केला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पूजा खेडकर यांनी पाथर्डीतील उपविभागीय अधिकार्‍यांकडून प्राप्त केलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जिल्हा सरकारी रुग्णालयाकडून प्राप्त केलेले दिव्यांग प्रमाणपत्र, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले असल्याने मंडळाकडून तसेच खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नासंदर्भात प्राप्तिकर विभागाकडून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अहवाल मागवले होते. या अहवालांचा अभ्यास करून त्याचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी सालीमठ यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

दिलीप खेडकर यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना एकूण 40 कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली. मात्र तरीही पूजा खेडकर यांना मनॉनक्रिमी लेअरफ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र 2022 मधील आहे. याबरोबरच जिल्हा सरकारी रुग्णालयाकडून त्यांनी 2018 व सन 2021 मध्ये नेत्र दिव्यांग व मनोविकार संदर्भात प्रमाणपत्र घेतले.सर्व विभागांनी स्वतंत्ररीत्या अहवाल सादर केले आहेत. याबरोबरच जिल्हाधिकारी सालीमठ यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चाही केली. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. त्याची कागदपत्रेही जिल्हाधिकार्‍यांनी ऑनलाइन पद्धतीने काढून घेतली आहेत.

लाचलुचपतकडून चौकशी सुरू
दरम्यान, दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची खुली चौकशी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. मात्र याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वादग्रस्तप्रकरण समोर येण्यापूर्वीच ही चौकशी सुरू झाली असून दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात एक पेक्षा जास्त अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाले असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दिलीप खेडकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झालेली आहे. पूजा खेडकर वादग्रस्तप्रकरण उघड होण्यापूर्वीच दिलीप खेडकर यांच्या विषयी लाचलुचपत विभागाकडे तक्रार आली होती. यात एक पेक्षा जास्त तक्रार अर्ज आले असून सुमारे चार ते पाच महिन्यांपासून खुली चौकशी करण्यात येत आहे. चौकशीच्या अनुषंगाने शासकीय संस्थांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खुली चौकशी असून देखील लाचलुचपत विभागाकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. अधीक्षक लोखंडे यांच्याकडे विचारणा केली असता, दिलीप खेडकर यांच्या संबंधी एक पेक्षा जास्त तक्रार अर्ज कार्यालयाकडे दाखल आहे. त्यांच्या संपत्तीची खुली चौकशी सुरू आहे. हे काम गोपनीय पध्दतीने सुरू असून याबाबत माहिती देता येणार नाही असे त्यांनी सांगितले.दरम्यान, येत्या काही दिवसांत ही चौकशी पूर्ण होऊन यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृतपणे माहिती दिली जाईल असे उपअधीक्षक लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या