मुंबई | Mumbai
२ नोव्हेंबर २०२५ चा हा दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी केली. रोमांचक अशा या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण अफ्रिकेच्या संघाला पराभूत करुन महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरत पहिलेवहिले एकदिवसीय जेतेपद पटकावले आहे. कपिल देव (१९८३), महेंद्रसिंग धोनी (२००७, २०११), रोहित शर्मा (२०२४) या दिग्गजांच्या मांदियाळीत आता हरमनप्रीत कौरच्या नावाचा समावेश झाला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे झालेल्या या सामन्याने जगभरातील भारतीय चाहत्यांची स्वप्न पूर्ण केली नाही तर महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची सुरवात झाली आहे.
आयसीसीकडून सर्वाधिक मोठी रक्कम
विश्वचषक सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघावर आता पैशांचा वर्षाव सुरु झाला आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसीकडून भारतीय महिला संघाला ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ४० कोटी रुपये बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले आहे. एखाद्या महिला क्रिकेट संघाला आत्तापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक मोठी बक्षिस रक्कम आहे.
बीसीसीआयकडून पैशांचा वर्षाव
विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील पैशांचा वर्षाव केला आहे. महिला संघाला रोख ५१ कोटी रुपये जाहीर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या बक्षीसाची घोषणा केली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा मोठे बक्षीस
बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी जाहीर केलेले बक्षीस हे विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर आयसीसीने दिलेल्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा मोठे आहे. आयसीसीने या स्पर्धेच्या विजेत्या संघाला ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३९.५५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडू, निवडकर्त्यांना तसेच अमोल मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला दिली जाईल,” असे देवजीत सैकिया यांनी बक्षीस जाहीर करताना म्हंटले आहे. विशेष म्हणजे जेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिलांना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रक्केमपेक्षाही बीसीसीआयने दिलेली ही रक्कम अधिक आहे.
दक्षिण अफ्रिकेला केवढी रक्कम मिळणार?
भारतीय महिलांसोबतच उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेनेही स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला उपविजेता म्हणून 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार २० कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
भारताचा ऐतिसाहिक विजय
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २९८ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शेफाली वर्माने ७८ चेंडूत ७ चौकार व २ षटकरांच्या मदतीने झटपट ८७ धावांची खेळी साकारली. तर, दीप्ती वर्माने अर्धशतकी खेळी (५८ चेंडूत ३ चौकार व एक षटकार) करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने अफ्रिकन महिला संघाचा पराभव करून त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपदकावर नाव कोरले. यापूर्वी भारताला २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत पोहचूनही जेतेपद पटकावण्यात अपयश आले होते. मात्र हा अपयशाचा डाग रविवारी भारतीय महिला संघाने पुसून टाकला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




