Monday, November 25, 2024
Homeक्रीडाICC World Cup : पाकिस्तान... छोटी सी आशा कायम

ICC World Cup : पाकिस्तान… छोटी सी आशा कायम

कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये पाकिस्तानच्या तेज तोफखान्याला तोंड देणं बांग्लादेशाला मंगळवारी अवघडच गेलं. परिणामी एक मोठा पराभव वाट्याला आणि विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या धुगधुगत्या आशा कायम आहेत. पूर्वार्धात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, सामन्याच्या उत्तरार्धात निर्विवाद फलंदाजी ह्यामुळं पाकिस्ताननं सहजपणे मोठा विजय मिळविला. बांग्लादेशाला दोनशेचा उंबरठा कसाबसा ओलांडता आला. ते लक्ष्य पाकिस्ताननं तेहतिसाव्या षट्कातल्या तिसर्‍या चेंडूवर गाठलं. पाकिस्तानला मंगळवारच्या लढतीत विजय मिळवणं आवश्यकच होतं. बांग्लादेशाची परिस्थितीही तीच. फकर जमान आणि अब्दुल्ला शफीक ह्या सलामीवीरांनी शांतपणे सुरुवात करीत विजयाचा मजबूत पाया रचला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी अर्थशतक गाठलं. नंतरच्या 10 षट्कांमध्ये 72 धावांची भर घातली.

गुडघेदुखीमुळं मैदानापासून लांब राहिलेल्या डावर्‍या फकरला इमाम उल हकच्या जागी संधी मिळाली. ती साधत त्यानं 74 चेंडूंमध्ये 81 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यात त्याचे सात षट्कार आणि तीनच चौकार होते. हीच खेळी त्याला सामन्याचा मानकरी ठरवून गेली. शफीकच्या 68 धावा 69 चेंडूंमध्ये आणि त्यात नऊ चौकार व दोन षट्कार होते. संघ फक्त जिंकून चालणार नाही, तर धावांची गतीही चांगली ठेवावी लागेल, हे उमजूनच पाकिस्तानची सलामीची जोडी खेळली. त्यांची जोडी 128 धावांची भागी करून बाविसाव्या षट्कात फुटली. मेहिदी हसन मिराजच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात अब्दुल्ला बाद झाला. त्याच्या जागी आलेला कर्णधार बाबर आजम (9) फार काळ टिकला नाही. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पाय न ताणताच मिराजला षट्कार मारण्याच्या नादात त्याचा लाँग-ऑनला झेल गेला. पाकिस्तानच्या धावसंख्येत नऊ धावांची भर पडली आणि मिराजने अजून एक झटका दिला. फकरचा स्लॉग स्वीप मिडविकेटला ताविद हृदयच्या हाती गेला. पाकिस्तान तीन बाद 169. त्यापुढे बांग्लादेशाला सामन्यात रंगत आणता आली नाही. महंमद रिजवान व इफ्तिकार अहमद ह्यांनी पाचच षट्कांत 36 धावांची झटपट भागीदारी करून विजय पक्का केला. डावातलं दुसरं व तिसरं षट्क निर्धाव पडलं; त्या पलीकडे बांग्लादेशी गोलंदाजांनी फार काही चांगली कामगिरी केली नाही.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून बांग्लादेशानं फलंदाजी स्वीकारली. शाहीन शहा आफ्रिदी, ज्युनियर वसीमम म्हणून ओळखला जाणारा महंमद वसीम (प्रत्येकी तीन बळी) आणि हारीस रऊफ (दोन बळी) ह्यांचा मारा खेळणं त्यांना जडच गेलं. सेहेचाळिसाव्या षट्कातल्या पहिल्या चेंडूवर त्यांचा डाव 204 धावांवर संपला. सलामीवीर तनजिद तमीम (0), नजमुल शांतो (4) आणि भरवशाचा मुशफिकर रहीम (5) तंबूत परत गेले, तेव्हा धावा होत्या फक्त 23. त्यातले दोन बळी आफ्रिदीचे होते. तनजिदला पायचित करून त्यानं एकदिवशीय क्रिकेटमधल्या बळींचं शतक पूर्ण केलं. लिटन दास व महमुदल्ला रहीम ह्यांनी तिसर्‍या जोडीसाठी 89 चेंडूंमध्ये 79 धावांची भागीदारी केली. हे दोघं खेळत असताना बांग्लादेश पावणेतीनशेचा टप्पा गाठील, असं वाटतं होतं. संथपणे आणि शांतपणे खेळणार्‍या लिटनला (64 चेंडूंमध्ये 45) इफ्तिकार अहमदने सलमान अली आगाकडे झेल द्यायला लावला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या