सलग सहा सामने जिंकून टीम इंडिया तुफान फॉर्मात असली तरी दोन कमकुवत बाजूंनी संघाची डोकेदुखी वाढली आहे. यातील पहिलेे कारण श्रेयर अय्यरची खराब फलंदाजी व दुसरे कारण म्हणजे शुभमन गिलचे अपयश. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी (2 नोव्हेंबर) होणार्या लंकेविरुद्धच्या सामन्यात या दोघांना विश्रांती देऊन इशान किशन व हार्दिक पंड्या संघात येण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या भारतीय संघाने लखनौच्या मैदानात इंग्लंडवर मिळवलेला विजय शंभर धावांनी म्हणजे 100 नंबरी होता. या विश्वचषकात भारताने पहिल्यांदाच पूर्वार्धात फलंदाजी करून हा विजय साजरा केला. भारताच्या हाताशी धावांचे अगदी माफक संरक्षण असतानाही भारतीय गोलंदाजांनी हा विजय खेचून आणला. भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय असल्याने भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रत्येकजण सध्या अंतिम विजयाचा दावेदार मानत आहे. शोएब अख्तरसारखा पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज रोहित शर्माच्या संघाची तुलना 2003 व 2007 मधील ऑस्ट्रेलिया आणि 1975-1979 मधील वेस्ट इंडिज संघाशी करीत आहे. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे, पण रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला दोन प्रश्न सतावत आहेत व ते म्हणजे शुभमन व श्रेयसचे करायचे काय? सेमी फायनलआधी याचा तोडगा निघाला नाही तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो.
रोहित शर्मा वगळता दुसर्या सलामी फलंदाजाला अद्याप आपली छाप सोडता आली नाही. रोहित शर्मा एका बाजूने खोर्याने धावा काढत आहे, पण दुसर्या बाजूला दुसर्या सलामीवीराला हवी तशी कामगिरी करता येत नाही. रोहित शर्माने सहा डावात 398 धावांचा पाऊस पाडला आहे. पण त्याच्या जोडीदाराला अद्याप मोठी खेळी करता आली नाही. युवा शुभमन गिल याच्याकडून प्रत्येक भारतीयाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. शुभमन आतापर्यंत चार सामने खेळला आहे. यामध्ये त्याला एकाच सामन्यात अर्धशतक करता आले. बांगलादेशविरोधात त्याने 53 धावांची खेळी केली. त्याशिवाय त्याला मोठी खेळी करता आली नाही. इतर तीन सामन्यात शुभमन याला 30 धावसंख्याही पार करता आली नाही. पहिल्या दोन सामन्यासाठी संधी दिलेला इशान किशन याला फक्त 47 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाविरोधात तो खातेही उघडू शकला नव्हता. तर अफगाणिस्तानविरोधात 47 धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे सेमी फायनलच्या आधी शुभमन गिल फॉर्मात परतणे इंडियासाठी महत्वाचे आहे.
2011 च्या विश्वचषकापासून भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण, हे पडलेले कोडे सुटले नाही. 2023 च्या विश्वचषकात श्रेयस अय्यर याला संधी दिली, पण तोही अद्याप शानदार कामगिरी करु शकला नाही. सहा सामन्यात अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरोधात अय्यरने अर्धशतक ठोकले, पण त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. त्याशिवाय इतर सामन्यात अय्यरला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात श्रेयस अय्यर चुकीचा फटका मारून बाद झाला. बाऊन्सर चेंडूवर अय्यर आपली विकेट फेकतो, हे प्रतिस्पर्धी संघांना आता समजले आहे. त्यामुळे सेमी फायनलच्या आधी अय्यर फॉर्मात परतला नाही, तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो. इंग्लंडविरोधात चुकीचा फटका मारुन अय्यर बाद झाल्यानंतर इशान किशनला संधी देण्याची मागणीही सोशल मिडियावर झाली आहे. त्यामुळे उद्याचा सामना हा शुभमन व श्रेयससाठी अस्तित्वाचा सामना होणार आहे. या सामन्यातील त्यांच्या खेळावर राहिलेल्या सामन्यात त्यांना संधी मिळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
सलामी फलंदाज व त्यांची कामगिरी
ईशान किशन : ऑस्ट्रेलिया-0 धावा व अफगाणिस्तान – 47 चेंडूत 47 धावा. शुभमन गिल : पाकिस्तान – 11 चेंडूत 16 धावा, बांगलादेश – 55 चेंडूत 53 धावा, न्यूझीलंड – 31 चेंडूत 26 धावा व इंग्लंड – 13 चेंडूत 9 धावा. चौथ्या क्रमांकावर येणार्या श्रेयस अय्यरची कामगिरी : ऑस्ट्रेलिया – 0 धावा, अफगाणिस्तान – 23 चेंडूत 25 धावा, पाकिस्तान – 62 चेंडूत नाबाद 53 धावा, बांगलादेश – 25 चेंडूत 19 धावा, न्यूझीलंड – 29 चेंडूत 33 धावा व इंग्लंड – 16 चेंडूत 4 धावा.