Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाICC World Cup Records : 1996..फिरकीच्या जोरावर सिंहलींची बाजी

ICC World Cup Records : 1996..फिरकीच्या जोरावर सिंहलींची बाजी

सहाव्या विश्वचषकाचे यजमानपद भारत, पाकिस्तान व श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे होते. 16 फेब्रुवारी ते 17 मार्च 1996 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेतील सामने तीन देशांत खेळवले जाणार होते. तामिल टायगर्सने श्रीलंकेतील सेंट्रल बँकेत केलेल्या बाँब हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामने विरुद्ध संघांनी सोडून दिल्याचे आयसीसीने घोषित केले व श्रीलंका संघ एकही सामना न खेळता उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र झाला. स्पर्धेत तब्बल 12 संघांचा समावेेश प्रथमच झाला होता. स्पर्धेत केनिया, संयुक्त अरब अमिरात व नेदरलँडचा नव्याने समावेश झाला होता.

13 मार्च 1996 रोजी ईडन गार्डन येथे झालेल्या उपांत्यफेरीत श्रीलंकेने भारताची दयनीय अवस्था केली. त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. त्यामुळे हा सामना श्रीलंकेला बहार करण्यात आल्याने त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. 4 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिजला धूळ चारून अंतिम फेरी गाठली. फॉर्मात असलेल्या श्रीलंका (कप्तान अर्जुन रणतुंगा) संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे (कप्तान मार्क टेलर) आव्हान होते. पाकिस्तानातील लाहोर (गद्दाफी स्टेडियम) येथे 17 मार्च रोजी हा सामना झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर आणि मार्क वॉ ही सलामीची जोडी मैदानात आत्मविश्वासाने उतरली. त्यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली.

- Advertisement -

मात्र, चेंडू सीमापाल टोलावण्याच्या नादात चामिंडा वासच्या गोलंदाजीवर मार्क वॉ (12 धावा) झेलबाद झाला आणि 36 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्यानंतर आलेल्या रिकी पाँटिंगने मार्क टेलरसोबत चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. तब्बल 101 धावांची भागीदारी करीत विश्वचषकात नवा विक्रम या जोडगोळीने केला. अरविंद डिसिल्वाने फिरकीच्या जोरावर ही जोडी फोडली. मार्क टेलर (83 चेंडूंत 74 धावा) झेलबाद झाला. त्यानंतर मात्र अन्य फलंदाज चांगली कामगिरी दाखवू शकले नाहीत. रिकी पाँटिंगचा (45 धावा) डिसिल्वाच्या गोलंदाजीवर त्रिफळा उडाला. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह वॉ (13 धावा), शेन वॉर्न (2 धावा), स्टुअर्ट लॉ (22 धावा), मायकेल बेवन (36 धावा), इयान हिली (2 धावा), पॉल रेफेल (13 धावा) हेही धडाकेबाज कामगिरी करू शकले नाहीत. 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने 241 धावांपर्यंत मजल मारली. अरविंद डिसिल्वाने 3 बळी घेतले.

श्रीलंकेसमोर 242 धावांचे आव्हान होते. स्पर्धेत फॉर्मात असलेली सनथ जयसूर्या व रोमेश कालुविथरानाची जोडी मात्र या सामन्यात मात्र फोल ठरली. धावफलकावर 12 धावा असताना जयसूर्या (9 धावा) धावबाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात कालुविथरानाही बाद झाला. नंतर मात्र असांका गुरूसिंहा (65 धावा) व अरविंदा डिसिल्व्हा (107) यांनी डाव सावरला. 125 धावांची भागीदारी त्यांनी केली. तब्बल 13 चौकार डिसिल्वाने ठोकले. संघाच्या 148 धावा असताना गुरूसिन्हा बाद झाला. त्यानंतर आलेल्या कप्तान अर्जुन रणतुंगाने (47 धावा) वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळत नव्हते. त्यामुळे ते पुरते हवालदिल झाले होते. तीन षटके बाकी असताना चौकार मारत श्रीलंकेने विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला आणि एकच जल्लोष झाला. ऑस्ट्रेलियाच्या डॅमियन फ्लेमिंग व पॉल रेफेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. शतकी खेळी व 3 गडी बाद करणार्‍या अरविंद डिसिल्वाला सामनावीर घोषित करण्यात आले.

– संदीप जाधव

(9225320946)

- Advertisment -

ताज्या बातम्या