Saturday, June 15, 2024
Homeनाशिकविरोधकांनी दलालीचे पुरावे सिद्ध केल्यास राजकारण सोडू : डॉ. भारती पवार

विरोधकांनी दलालीचे पुरावे सिद्ध केल्यास राजकारण सोडू : डॉ. भारती पवार

खोट्या आरोपांपेक्षा विकास करून दाखविण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

माझी किंवा माझ्या कुठल्याही जवळच्या अथवा दूरच्या नातेवाईकांची ‘नाफेड’मध्ये कुठल्याही प्रकारची मध्यस्थी अथवा भागीदारी नाही. विरोधकांनी पुरावानिशी आरोप सिद्ध करावेत. तसे केल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण असताना डॉ. भारती पवार यांनी जवळच्या लोकांच्या नावे फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन करून ‘नाफेड’मध्ये सर्वात मोठी दलाली केली’ असा आरोप देवळा तालुक्याचे मविप्र संचालक विजय पगार यांनी केला. त्याबाबत डॉ. भारती पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून केवळ मतदारसंघातच नव्हे तर देशात कर्तव्याची छाप टाकली आहे. करोनाकाळात मोठे काम उभे केले. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.१५ मेस पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या सभेत जाहीरपणे सांगितले.

असे असताना कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या धोरणात वेळोवेळी झालेला बदल लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफमार्फत लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार पत्रव्यवहार केला. शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान हमीभाव मिळण्यासाठी नाफेड व एनसीसीएफला कांदा खरेदी करण्यास भाग पाडले, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. अशावेळी बिनबुडाचे आरोप करून विरोधक आपली जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

आरोपांचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करून दाखवा, असे आव्हान डॉ. पवार यांनी विरोधकांना दिले आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून भविष्यात कांदाप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’मधून आपण प्रयत्न करणार आहोत, असेही डॉ. पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या