नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, आयएफएस अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान कार्यालयात (PMO) खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वाराणसी येथील निधी तिवारी या 2014 बॅचच्या भारतीय विदेश सेवा (IFS) अधिकाऱ्या आहेत. पंतप्रधान कार्यालयातील त्यांच्या या नव्या भूमिकेसाठी कॅबिनेटने मंजुरी दिली असून, त्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात आली आहे.
निधी तिवारी यांनी 2013 मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली. प्रारंभी, वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानंतर भारतीय विदेश सेवेत (IFS) रुजू झाल्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात त्यांनी परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात काम पाहिले आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना थेट रिपोर्ट करायच्या. परराष्ट्र धोरण, अणुऊर्जा आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे.
खाजगी सचिव म्हणून निधी तिवारी यांच्यावर आता अधिक जबाबदारी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश-विदेश दौऱ्यांचे नियोजन, विविध सरकारी विभागांशी समन्वय आणि प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्याकडे असणार आहे.
पंतप्रधान कार्यालयात महिलांचा वाढता सहभाग हा महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. निधी तिवारी यांची नियुक्ती महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.