संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
कोल्हार-घोटी राज्यमार्गावर शहरानजीक बंदी असतानाही अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्यास गुटखा आणि वाहन असा मिळून एकूण 6 लाख 93 हजार 600 रुपयांच्या मुद्देमालासह पकडले आहे. सदर कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 25) दुपारी बारा वाजेच्या सुमारास केली आहे. यामुळे अवैध धंदे चालकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, राज्यात गुटखा बंदी असतानाही वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
पथकाने शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर सुनील रमेश नाईकवाडे (रा. धामणगाव पाट, ता. अकोले) हा कारमधून (क्र. एमएच.01, डीइ.7966) गुटखा घेऊन जात असताना पकडला. त्याच्याकडे चौकशी केली असता हा गुटखा कोल्हापूर येथील गोपाल (पूर्ण नाव माहीत नाही, फरार) याच्याकडून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 74 हजार 240 रुपयांचा गुटखा, 19 हजार 360 रुपयांची सुगंधी तंबाखू व 5 लाख रुपयांची कार असा एकूण 6 लाख 93 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश पाटील हे करत आहे.