श्रीरामपूर | अशोक गाडेकर| Shrirampur
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अवैध गुटखा व्यावसायावर ‘धडाकेबाज’ पोलीस कारवाई सुरु आहे. शेवगाव तालुक्यातील एका आजोबांनी नव्याने आलेले जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्यापुढे नातवाच्या गुटखा व्यसनाबद्दल हतबलता व्यक्त केली. तेवढ्याच संवेदनशिलतेने श्री. घार्गे यांनी दखल घेत प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्यावर जिल्ह्यातील सर्व गुटखा व्यावसायांवर कारवाईचे आदेश दिले. श्री. खाडे यांनीही वरिष्ठांचा आदेश शिरसंधान मानून गुटखा कारवाईचा धडाका सुरु केला आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांनी सूत्रे हाती घेतली. यापूर्वी श्रीरामपूर येथे पोलीस उपाधिक्षक तसेच त्याच काळात अहिल्यानगर, बीड व पुणे जिल्ह्याच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे काम पाहिल्याने सहाजिकच जिल्ह्यातील अनेक जणांशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदाचा पदभार स्विकारताच अनेकांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली.
सत्कारासाठी जमलेल्या गर्दीत एक धोतर घातलेले वयोवृध्द श्री. घार्गेे यांना दिसले. मात्र गर्दीमुळे त्या वयोवृध्दास आत येता आले नाही. हे श्री.घार्गे यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी गर्दी कमी झाल्यावर त्या आजोबांना आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतले. शेवगाव तालुक्यातील एका छोट्या खेडेगावातून आलेले आजोबा त्यांच्या शेतातील रस्त्याबाबत तक्रार घेऊन आले होते. ती ऐकून घेतल्यावर श्री. घार्गे यांनी गावात काय वातावरण असा प्रश्न आजोबांना केला. त्यावर ते आजोबा म्हणाले, साहेब पूर्वी गावात एकही पानटपरी नव्हती, आता पाच पानटपर्या झाल्या आहेत. तेथेे गुटखा विक्री होत असल्याने तरुण पिढीसह लहान मुलेही गुटखा व्यसनाच्या आहारी गेली आहेत.
माझा सहा वर्षाचा नातूही गुटखा खातो. त्याला या व्यसनापासून दूर करण्याचा बराच प्रयत्न केला मात्र तो ऐकत नाही. त्यामुळे त्याचा गुटखा खाणे बंद कसे करावे हे समजत नाही. आजोबांची ही हतबलता पाहून श्री. घार्गे काही काळ स्तब्ध झाले. ते आजोबा गेल्यावर श्री. घार्गे यांनी तत्काळ जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक म्हणून आलेले व अवैध व्यावसायिकांचा ‘कर्दनकाळ’ ठरलेले संतोष खाडे यांना बोलवून घेतले. संपूर्ण जिल्ह्यातील गुटखा तसेच मावा बनविणारे केंद्र तसेच अवैध गुटखा विक्री वर कारवाई करण्याचे आदेश दिले.
श्री. खाडे यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत गुटख्याविरोधी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांनी अवैध गुटखा व्यावसायावर धाडी टाकून कारवाई केली आहे. त्यात सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाला जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात असेपर्यंत गुटखा विरुध्द कारवाई सुरुच!
जिल्ह्यात दर महिन्याला सुमारे 8 कोटी रुपयांचा गुटखा खाल्ला जातो. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनविला जाणारा मावा ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर याठिकाणी ट्रकने पाठविला जातो. जिल्ह्यात नवीन अधिकारी आला की ‘नव्याचे नऊ दिवस’ अशी कारवाई केली जाते, असा अवैध व्यावसायिक व नागरिकांचा समज आहे. गुटखा कारवाईबाबत मात्र तसे होणार नाही. मी जिल्ह्यात असेपर्यंत कोणत्याही परीस्थितीत गुटखा सुरु होऊ देणार नाही.
– सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर.




