कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातून अवैध गुटखा विक्री समूळ नष्ट करण्याचे निर्देश दिल्यानंतर, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या ‘मिशन गुटखा’ अंतर्गत कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सुमारे 2 लाख 43 हजार 716 रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक स्विफ्ट कार हस्तगत करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. पथकामध्ये पोलीस अंमलदार भीमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, सतिष भवर, प्रमोद जाधव आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता. जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणार्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पथकाला देण्यात आले होते. दि. 10 डिसेंबर रोजी या पथकाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दोन छापे टाकले. पहिली कारवाईत शारदानगर, कोपरगाव येथील रहिवासी प्रमोद सजन बोथरा आणि नाशिक येथील मुस्ताक अब्बास सय्यद जो सध्या फरार आहे. यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार आणि 28 हजार 80 रुपये किमतीचा अवैध गुटखा असा एकूण 2 लाख 28 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसर्या छाप्यात योगेश विजय कटाळे (रा. खडकी) आणि नामदेव संजय पगारे (रा. सुभाषनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 15 हजार 636 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला. अवैध गुटख्याच्या वाहतूक आणि विक्रीच्या आरोपावरून या चारही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 आणि 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम यापुढेही अधिक कठोरपणे सुरूच राहील, असे स्थानिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.




