कोपरगाव । तालुका प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात गोदावरी नदीपात्रातून चोरट्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतुक करणाऱ्या वाळू तस्करांवर पोलिस अधिक्षकांच्या विषेश पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत ५५ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. या कारवाईत सात जणांविरूद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परीविक्षाधीन पोलिस अधिक्षक संतोष खाडे यांनी दि. ८ जुलै रोजी कोपरगावात गुटखा व सुगंधी तंबाखूसह टेम्पो असा एकूण ७६ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा आपला मोर्चा कोपरगावकडे वळविला. बुधवारी (दि. १६ जुलै) पहाटे तीनच्या सुमारास विशेष पथकाने माहेगाव देशमुख शिवारातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. यावेळी ट्रॅक्टर व ट्रॉली, पाच डंपर व वाळू असा एकूण ५५ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी संतोष लक्ष्मण ठमके (रा. मुर्शतपुर), अर्जुन भाऊसाहेब गुरुळे (रा. मुर्शतपुर ), गणपत पंडित पवार (रा. पारेगाव, ता. येवला), आणि अमोल लक्ष्मण इंगळे (रा. मळेगावथडी) यांना ताब्यात घेतले आहे.
तर अमोल वसंत मांडगे (रा. कोपरगाव), रामा कुंदलके (रा. कोळपेवाडी) व अजय शेळके (रा. कोपरगाव) हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. वरील सात जणांविरूद्ध पोलिस हवालदार सुनिल दिघे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




