संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर महसूलच्या महिला भरारी पथकाने मंगळवारी (दि. 20) सकाळी सात वाजता मोठी कारवाई करत अवैधरित्या वाळूसह सँडवॉशची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केली. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली असून महसूल प्रशासन आता कारवाईसाठी दिवस-रात्र सज्ज झाले आहे.
तहसीलदार धीरज मांजरे यांना संगमनेर ते हिवरगाव पावसा भागात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या महिला तलाठी यांचे भरारी पथक सकाळीच टोलनाका परिसरात पोहोचले. या पथकात तलाठी रत्नाप्रभा गागरे, प्राजक्ता डोंगडे, पूनम वैद्यकर, कोतवाल चंदू भालेराव, कैलास भालेराव यांचा समावेश होता. त्यांनी अचूक नियोजन आणि संयमाने ही कारवाई यशस्वी केली.
सदर पथकाने संशयित तीन वाहने थांबवून त्यांची झडती घेतली. त्यातील एका वाहनात मोठ्या प्रमाणात वाळू आढळली, तर दुसर्या वाहनातून सँडवॉश (रेतीसदृश मटेरिअल) अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे उघड झाले. महसूल विभागाने दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, पंचनामा करून संबंधित वाहनधारकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील काही भागांतून वाळूतस्करीचे प्रकार वाढले असून, दिवसाढवळ्या ही वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अशाप्रकारे होत असलेला नास सर्वांसाठी धोकादायक आहे. महसूल प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले की या अवैध धंद्यांमध्ये कोणताही राजकीय किंवा स्थानिक दबाव मान्य केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आता भरारी पथक दिवसाही गस्त घालणार…
आत्तापर्यंत रात्रीच्या वेळी गस्त घालणारे भरारी पथक कार्यरत होते. मात्र आता तस्करी दिवसा होत असल्यामुळे दिवसाही गस्त घालणार्या भरारी पथकाची नियुक्ती केली जात आहे. वाळूतस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. अवैधरित्या वाळू व सँडवॉश वाहतूक करणारी तीन वाहने महसूलच्या महिला भरारी पथकाच्या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत. पंचनामा करून नोटीस देण्यात येणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
– धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर)