अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील चास घाटात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या भंगार वाहतूक करणार्या एका ट्रकला अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पकडले. चालकाकडे ट्रक किंवा त्यातील मालाच्या मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा न आढळल्याने, पोलिसांनी ट्रक व भंगार असा एकूण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी ट्रक चालक चंद्रकांत शेळके (वय 34, रा. वाकवड, ता. भुम, जि. धाराशिव, हल्ली रा.पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 9) मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीस पथक चास घाट परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक मालट्रक (एमएच 09 बीसी 5411) संशयास्पदरीत्या जाताना आढळला. पोलिसांनी ट्रक थांबवून चालक चंद्रकांत शेळके याच्याकडे चौकशी केली. ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये लोखंडी पत्रे आणि इतर विविध प्रकारचे लोखंडी भंगार साहित्य आढळून आले.
पोलिसांनी या मालाच्या वाहतुकीबाबत आणि मालकी हक्काबाबत चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, शेळके याला ट्रक अथवा त्यातील भंगार मालाच्या मालकीबाबत कोणताही पुरावा किंवा समाधानकारक कागदपत्रे सादर करता आली नाहीत. पोलिसांनी कारवाई करत सहा लाख रूपये किमतीचा मालट्रक आणि अंदाजे तीन लाख रूपये किमतीचे भंगार साहित्य, असा एकूण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार दिनकर घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलीस ठाण्यात चंद्रकांत शेळके विरोधात दाखल करण्यात आला आहे.




