अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इमामपूर (ता. अहिल्यानगर) येथील शेतातील विहिरीत पडून 24 वर्षीय तरूण विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (27 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव जयश्री अक्षय टिमकरे (वय 24, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास जयश्री टिमकरे या शेतातील विहिरीच्या पाण्यात पडून बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या.
हा प्रकार नातेवाईकांसह स्थानिकांच्या लक्षात आला. त्यांनी जयश्री टिमकरे यांना विहिरीतून बाहेर काढले व नातेवाईक अशोक निवृत्ती खंडागळे (रा. पांढरीपुल, ता. अहिल्यानगर) यांनी त्यांना उपचारासाठी पहाटे सुमारे 3.15 वाजता येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तशी माहिती डॉ. पोहे यांनी रूग्णालयात ड्युटीवरील पोलीस अंमलदार गांगुर्डे यांना दिली.
त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तसेच पथकाने घटनास्थळास भेट दिली. मृत्यूचे नेमके कारण, अपघात की अन्य काही याबाबत तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे इमामपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




