Friday, May 3, 2024
Homeब्लॉगब्लॉग : आईस्क्रीम, कुल्फी आणि बरेच काही.. (उत्तरार्ध)

ब्लॉग : आईस्क्रीम, कुल्फी आणि बरेच काही.. (उत्तरार्ध)

ईस्क्रीमबरोबरच आईस्क्रीमचा स्कुप, कोन, यांचा पण इतिहास आहे. सुरुवातीला गाडीवर आईस्क्रीम विकायला येत असे आणि ते निमुळत्या काचेच्या किंवा धातूच्या कोनमध्ये द्यायचे. तेच पात्र परत वापरले जायचे.

निमुळता कोन, पात्राचे पण श्रेयऍग्नेस मार्शल बाईंना जाते. खाणीय/आईस्क्रीमबरोबर अथवा नंतर खाण्यायोग्य कोन जे आता प्रचलित आहेत. ते मात्र 1901 मध्ये, अँटोनियो व्हाल्वोना या इटालियन, पण मँचेस्टरस्थित गृहस्थाने शोधले. त्याला बिस्किटयुक्त कोन याबाबतचे पेटंट, एकस्व मिळाले. कोनमुळे एक मोठा आणि पूरक बदल घडला. बिस्कीट, वेफर कोन आणि आईस्क्रीम समीकरण झाले.

- Advertisement -

असा हा आईस्क्रीमचा इतिहास! खाण्याच्या बाबतीत मात्र एक चिमुकले राष्ट्र सर्वात पुढे आहे ते म्हणजे न्यूझीलंड! न्यूझीलंडचा नंबर सर्वात वर आहे. कारण या देशात दरडोई दरवर्षी 28 लिटर आईस्क्रीम फस्त होते तर अमेरिकेत 20 लिटरआणि त्याच्या खालोखाल ऑस्ट्रेलिया 18 लिटर. पहिल्या दहात सर्वात जास्त आईस्क्रीम खाणार्‍या देशात कोरिया हा एकमेव एशियन देश आहे जो 12.3 लिटर दरडोई दरवर्षी आईस्क्रीम फस्त करतो. जागतिक सरासरी 2.3 लिटर दरडोई दरवर्षी आहे तर भारत 0.3 लिटर दरडोई दरवर्ष आईस्क्रीम खातो.

आईस्क्रीममध्ये आता विविध प्रकार आले आहेत. ब्रँडही आले आहेत. क्रिम अँड स्टोन नामक आईस्क्रीम कुटून, कांडून, पावभाजीसारखे करून मिळते तर आपल्या मनपसंद मद्याचे, चव आणि स्वादाचे आईस्क्रीमसुद्धा मिळते. एक्सस्प्रेसो कॉफी आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. प्रत्येकाशी आपले जमेलच असे नाही.भारतात मात्र कितीही ब्रँड आले तरी मेवाड आईस्क्रीमच्या गाड्या अजूनही सगळीकडे दिसतात.

मेवाड आईस्क्रीम सगळीकडे कसे काय पोहचले हे मात्र उलगडले नाही. भिलवाडा, राजस्थानमधील मेवाड प्रांतातल्या युवकाने एका दुष्काळात उपजिविकेकरता शेती सोडून पारंपरिक दुधाच्या पदार्थाचे गोठलेले आईस्क्रीम करून हातगाडीवर विकायला सुरुवात केली आणि ते सगळीकडे पसरले असे म्हणतात.आईस्क्रीम आल्यावर मग त्याचे बर्‍याच पदार्थांबरोबरसंधान बांधण्यात आले. गरम गुलाबजाम, लस्सी, फळांबरोबरसुद्धा!

’मस्तानी’ नावाने आईस्क्रीम, दूध, कस्टर्ड यासारखे जे काय अद्भूत रसायन बनले आहे ते मात्र पुणे या पुण्यनगरीची अजून एक अस्मिता बनले आहे.गुजर, कावरे, सुजाता, खत्री आदी स्वतःचे खास गिर्‍हाईक, चव टिकवून आहेत. आता मस्तानी म्हटले तर बाजीराव पेशवे आठवणार, पण तसा काही बादरायण संबध नाही. काही प्रवादानुसार ’काय मस्त’ या विशेषणामुळे ’मस्तानी’ असे झाले असावे, पण पुण्यात आलात आणि मस्तानी चाखली नाही? मग तुम्ही काय केले? असे होऊ देऊ नका. यातील एका मस्तानीमध्ये अजूनही पॉट आईस्क्रीमचेच आईस्क्रीम असते.

आईस्क्रीमची लहान बहीण किंवा भाऊ म्हणजे आईस्फ्रूट, आईस कँडी, आईसपोल, आईस जॉलीचा शोध चक्क एका अकरा वर्षाच्या मुलाने लावला आहे हे कोणाला पटणार नाही. त्यापुढे तो स्वतः याच उद्योगात एक प्रतिथयश उद्योजक झाला. सॅनफ्रान्सिकोमध्ये, 1905 च्या सुमारास, फ्रँक इप्परमन नावाचा मुलगा पाण्यात सोडा पावडर, साखर घेऊन एक पेल्यात मिश्रण तयार करीत होता, संध्यकाळच्यावेळेस पिण्याकरता ठेवले. त्यात ढवळण्याकरता ठेवलेली काडी, चमचाही तसाच राहिला आणि तो विसरून गेला.

रात्रभर ते पेय तसेच होते. सकाळी उठून बघतो तर ते गोठून घट्ट झाले होते आणि ते सहज बाहेर निघाले पेल्यातून, चोखून बघितल्यावर त्याला त्या मिश्रणाचीच चव लागली. हीच कल्पना त्याने पुढे व्यवसायात वापरली. ती जगप्रसिद्ध झाली. पेप्सी कोला किंवा आईसपॉपजे प्लास्टिकमध्ये मिळते हे आईस्फ्रूट,कुल्फी, आईस्क्रीमचा मधला स्वस्त अवतार! बर्फ का गोला हा एक स्वतंत्र प्रकार. प्रत्येक शहरात एकतरी लोकल आईस्क्रीम, कुल्फी आणि बर्फका गोलावाला प्रसिद्ध असतोच. त्याची ती बर्फ किसायची मशीन, गाडीवर मांडलेल्या रंगीबिरंगी स्वादाचे सरबत भरलेल्या रंगीत बाटल्या अजूनही मोहवून जातात.

भारताचे म्हणाल, तर कुल्फी या प्रकारास आईस्क्रीमपेक्षा जुना इतिहास आहे. सोळाव्या शतकात तिचा उगम झाला म्हणतात. भारतात दूध आटवून केलेले पदार्थ प्रसिद्ध होतेच, मग रबडी, पिस्ता, केसर, सुकामेवाअसलेले द्रव्य गोठल्यानंतर होते ती कुल्फी.

कुल्फी नुसते म्हटले तरी लगेच तिची जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी चव येते. कुल्फीचे स्वतःचे, स्वतंत्र आणि विशिष्ट स्थान आहे. दुसरे म्हणजे कुल्फी आईस्क्रीमपेक्षा घट्ट आणि जास्त स्निग्ध असते. कारण कुल्फी दूध आटवून केली असते . त्यात इतर सुकामेवा आणि मालमसाला असेल तरविचारायलाच नको.

कुल्फी म्हटले की, डोळ्यासमोर येते हातगाडीवर चौकोनी पेटीत अडकवलेले कोन आणि त्यात बांबूच्या काड्या. लहानपणी 5,10,25 पैसे कुल्फी असलेला प्रवास पुढे 1,5,10 रुपये होऊन त्यापुढे गेला. दुसरा प्रकारम्हणजे मटका कुल्फी! हंडीच्या आकाराची. कुल्फीवाला भल्यामोठ्या माठात हात घालून तो पत्र्याचे अंडाकृती आकाराचे पात्र काढणार त्यावरचे रबरी, सायकल ट्यूबपासून तयार केलेले आवरण काढणार.

बांबूची काडी खुपसून पाण्यात ढवळणार. याने ते आवरण मोकळे होते आणि मग आपल्या हातात देणार. यात आजपावेतो कधीही सायकलची ट्यूब किंवा पत्र्याचे आवरण याचे काही वावगे वाटले नाही.हे दोन्ही कसाही आकार असले तरी पत्र्याचे पात्र आणि रबरी ट्यूबचे सील मात्र तेच.हे कुल्फीवाले कुठली कुल्फी किती रुपयाची कसे ओळखतात तेच जाणे.

मात्र काडीची कुल्फी खाण्यात जी मजा आहे ती प्लेट, डिशमध्ये घेऊन काटा चमच्याने खाण्यात नाही. आईस्क्रीमएवढी कुल्फीची व्याप्ती वाढली नसली तरी आता कुल्फी पण ब्रँडेड होऊ लागली आहे. केवळ कुल्फी वेगवेगळी प्रकारची अशीही दुकानं निघत आहेत.कुल्फीवाल्यांचा धंदा करायची वेळ एक तर दिवसा किंवा साधारणपणे संध्याकाळते रात्री उशिरापर्यंत. कुल्फी घेणारा वर्ग पण या दोन वर्गात मोडतो.महाविद्यालयीन काळात आमचे एक स्नेही पहिल्या मजल्यावर राहायचे.

वरतून दोरीने भांड्यासह पैसे सोडायचे आणि कुल्फी वर ओढून घ्यायचे. रात्री उशिरा जाणार्‍या कुल्फीवाल्यांबरोबर कधी-कधी घासाघीस करायचे ते, पण हे सांगून की, ’आता रात्री तरी तुम्ही त्या उरलेल्या कुल्फीचे काय करणार? वाया जाईल. त्यापेक्षा रुपयावाली कुल्फी मला पन्नास पैशाला द्या!’कुल्फीचे एक बरे आहे की, अजून तरी सर्व पारंपरिक स्वाद मिळतात.

केशर पिस्ता, आंबा, मावा वगैरे! इकडे आईस्क्रीममध्ये मात्र त्याला कुठला स्वाद देऊन त्या आईस्क्रीमच्या तोंडाचे पाणी पळवत आहे. पेरू आईस्क्रीम, पुरणपोळी आईस्क्रीम, तीळगुळ आईस्क्रीम. काही दिवसांनी मिठाईवाले आणि आईस्क्रीमवाले एकच दुकान ठेवतील. जेवण झाल्यावर म्हणून ’पान – विड्याचे’ आईस्क्रीमसुद्धा मिळते.

नशीब त्या पानात कोणी 120-300 जर्दा किंवा चटणी – चमनबहार नाही मागत.असे हे आईस्क्रीम… कुल्फी पुराण! उन्हाळ्याआधी सादर करावे असा मानस होता, पण आता काय ऋतू असा राहिलाच नाही . उन्हाळा असा नाहीच. कधीही पाऊस येतो-जातो. आईस्क्रीम आणि कुल्फीसुद्धा मिळते बारमाही!

- Advertisment -

ताज्या बातम्या