मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. अशातच आपल्यासोबत असलेल्या आमदारांनी वेगळा विचार करू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांकडून शपथपत्रे लिहून घेतल्याचे समजते.
महायुतीला २३६ जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना शिंदे गटाने ५७ जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. गेल्यावेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली होती. शिवसनेतील बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षातील मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.
शिंदेंनी लिहून घेतली प्रतिज्ञापत्र
नवनिर्वाचित आमदारांची ताज लँड्स येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली असून पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र तरीही शिंदेंकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिवसेना बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आता सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत असल्याचे दिसून येत आहे.
उध्दव ठाकरेंनी घेतली खबरदारी
शिवेसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी ‘मातोश्री’वर नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. नवनिर्वाचित आमदारांसह पक्षाचे विधान परिषद सदस्य तसेच खासदार या बैठकीला उपस्थित होते. विधिमंडळ आणि विधानसभेतील नेत्यांची निवड बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र देखील लिहून घेण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा