Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा निवडणुकीत चुरस वाढणार

नाशिक मनपा निवडणुकीत चुरस वाढणार

नाशिक । फारूक पठाण Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS ) हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर नाशिकसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुकींमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना तसेच भारतीय जनता पक्षाची युती होण्याची चर्चा रंगू लागली होती, मात्र मुंबईत महाराष्ट्र निर्माण सेनेचे सचिव संदीप देशपांडे यांनी मुंबईसह सर्व निवडणुका मनसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत देखील चुरस वाढणार आहे. नाशिक मनपा निवडणुकीसाठी मनसेनेची तयारी पूर्ण असून सर्व मतदारसंघांमध्ये आमचे सक्षम उमेदवार असल्याचा दावा स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीकडे पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांचे विशेष लक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढण्यात येणार असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून येत आहे.

2012 ते 17 या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता होती. या काळात नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्याचे आयोजन देखील चोखपणे झाले होते. शहरातील रिंग रोड तयार करण्यापासून मूलभूत सुविधा देण्यासाठी त्या वेळेला विशेष लक्ष देण्यात आले होते. तसेच बॉटनिकल गार्डन, गोदा घाट सुशोभीकरण, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प तयार करण्यात मनसेनेला यश आले होते. विशेष म्हणजे मनसेनेच्या सत्ता काळात जे रस्ते तयार झाले किंवा जी विकास कामे झाली त्याच्यात एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील झाला नाही व रस्त्यांवर खड्डे देखील पडले नाही, असा दावा करण्यात येत आहे.

मात्र 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र निर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तसेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यामुळे नाशिक महापालिकेची मनसेची सत्ता भाजपच्या हाती गेली. तर बोटावर मोजण्या इतकेच मनसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तरीही पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा चाहता वर्ग तसेच मराठी माणूस यासह हिंदुत्व या मुद्द्यावर महाराष्ट्र निर्माण सेनेने सतत काम सुरूच ठेवले. मराठी पाट्यांबाबत अनेक आंदोलने करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील संघटन बांधणीवर विशेष लक्ष देण्यात येऊन शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आदींची नव्याने नेमणूक करण्यात आली.

पक्षाचे सतत काही ना काही आंदोलने, उपक्रम सुरू असल्यामुळे तरुण वर्ग देखील पक्षाकडे सध्या चांगला आकर्षित झाल्याचे दिसत आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्यामुळे नाशिक मधील निवडणुकीत रंगत वाढणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे नाशिक मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना आता मनसेनेने देखील सर्व उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे व दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मागील दोन वर्षापासून तयारीत असल्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत काट्याची होणार हे नक्की झाले आहे.

आयात उमेदवारांना तिकीट नाही

नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश मिळाल्याने त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. आमची यापूर्वीच तयारी पूर्ण झाली होती. शहरातील प्रत्येक प्रभागात महाराष्ट्र निर्माण सेनेचे संघटन मजबूत आहे. तरुणांची फौज आमच्याकडे तयार असून अमित ठाकरे स्वतः निवडणुकीवर लक्ष देत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. यंदा तरुणांना चांगली संधी देण्यात येईल, पक्षाचे सर्व पदाधिकारी सतत शहरातील सर्व भागात दौरे करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

– अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या