श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप अनिल बनकर व प्रवाशांनी केला आहे. 15 सप्टेंबरला पाऊस पडल्यानंतर ओढे-नाले पुराच्या पाण्याने वाहू लागले. दरम्यान, देवदैठण जवळील राजापूर फाटा या ठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या पुलाला भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी पुलाचे पाईप हे अर्धा फुटाणे पुढे सरकले असून रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने यंत्राच्या सहाय्याने त्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी पडलेल्या भगदाडावर रात्रीच्या अंधारात डागडुजी करण्याचा केविलवाना प्रयत्न ठेकेदारांकडून करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नाशिक यांनी या कामाची पाहणी करून चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे. हे काम 43 किलोमीटर असून 200 कोटीचे काम आहे. सिमेंट काँक्रेटमध्ये हा रस्ता होणारा आहे. या रस्त्यामध्ये अनेक पुलाचे काम त्यामध्ये फाउंडेशनची पीसीसी ही निकृष्ट दर्जाची झालेली असल्याचा आरोप अनिल बनकर यांनी केला आहे.
गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा काम चालू आहे. सदरील पुलाच्या कामाची माहिती घेतली, त्या ठिकाणी वीज पडली आहे, असे आम्हांला कळले आहे. सदरील काम व्यवस्थित केले जाईल.
– इमरान शेख, (अभियंता विकास महामंडळ, नाशिक)
मी या पुलाच्या परिसरामध्ये राहतो. या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची वीज पडल्याची आमच्या निदर्शनात आले नाही. तसेच त्या पुलाच्या काही अंतरावर वीटभट्टी आहे व त्या ठिकाणी माणसे राहत आहे. विज पडली असे कोणीही सांगत नाही.
– श्री. संजय कोळपे, (माजी सरपंच हिंगणी दुमाला)




