नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरात डोळ्यांचे आजाराचे प्रमाण वाढू लागले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासोबतच शाळांमध्ये इतर मुलांना डोळ्यांचा विकार जाणवत असेल त्या विद्यार्थ्यांना 4 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी सांगितले.
शहरात मागील दोन दिवसांत डोळे येण्याच्या त्रासाचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी 140 नेत्ररुग्ण दाखल झाले होते. या रुग्णाची संख्या वाढून शुक्रवारी 156 रुग्ण दाखल झाले. शुक्रवारच्या आकडेवारीत बिटको आणि जाकीर हुसेन या रुग्णालयांतील रुग्णसंख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले होते.याबाबत नागरिकांनी जागरूकता पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.रावते यांनी केले.
डोळे येणे हा आजार संसर्गजन्य असून सातत्याने हात धुवून डोळ्यानां लावणे, डोळे सातत्याने पाण्याने धूवत राहणे, डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास, डोेळ्यात लालसरपणा असल्याची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकार्यांकडून इलाज करुन घेणे. डोळ्यांचा आजार बरा होईपर्यंत इतरांच्या संपर्कात येऊ नये, असेही रावते त्यांनी सांगितले.
याबाबत शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांना लेखी स्वरूपात सूचनापत्र देऊन सर्व शाळांतून आवाहन करण्याच्या सूचना मनपा शिक्षणाधिकार्यांनी दिली आहे.
डोळे आलेल्या रुग्णास क्वारंटाईन करा- जिल्हा आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रांना सूचना
नाशिक जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरु झाली असून संसर्ग वाढू नये, यासाठी डोळे आलेल्या रुग्णांस क्वारंटाईन करा, रुग्णाची योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांना दिल्या आहेत.डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो वायरसमुळे होतो.
ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरु आहे किंवा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात आरोग्य सेवकांच्या मदतीने घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात यावे. या भागात पावसामुळे चिकचिक, घरगुती, माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपायोजना कराव्यात. डोळे आलेल्या रुग्णांमध्ये डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करायला हवा तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
एकापासून दुसर्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांंच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रात योग्य ती दक्षता घेऊन सर्वसामान्य जनतेला आवश्यक आरोग्य शिक्षण देण्यात यावे. डोळ्यांचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी यामध्ये वैद्यकीय सल्ला घ्यावा, जनजागृती करण्यात यावी.