Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाInd vs Aus 2nd ODI : भारताचा ५१ धावांनी लाजीरवाणा पराभव

Ind vs Aus 2nd ODI : भारताचा ५१ धावांनी लाजीरवाणा पराभव

मुंबई | Mumbai

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताला ५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३८९ धावा केल्या आणि भारताला ३९० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकात ९ बाद ३३८ धावाच करता आल्या. भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत १०४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून शमी, बुमराह आणि पांड्याने १-१ बळी घेतला.

पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने ६० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.

यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने स्मिथने १०४ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद ६३ धावा केल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या