मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सध्या ५ टी २० सामन्यांची मालिका (Series) खेळविण्यात येत आहे.या मालिकेत यजमान भारतीय संघाने कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी २० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आज (शनिवारी) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम वर खेळविण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता खेळविण्यात येणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इंग्लंडची धुरा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरकडे (Joss Buttler) असणार आहे. मालिकेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे. इंग्लंडला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असणार आहे. तर भारतीय संघ आपली आघाडी अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. विशेष म्हणजे इंग्लंड संघ या मैदानावर प्रथमच सामना खेळणार आहे.
तर दुसरीकडे भारतीय संघाने (Team India) या मैदानावर दोन सामने खेळले असून, न्यूझीलंड विरूध्द भारतीय संघाला १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २०१८ मध्ये खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय संपादन केला होता.दरम्यान सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नसल्याने एक रोमांचक सामना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामन्याच्या दिवशी तापमान २८ ते २२ डिग्री अंश सेल्सिअस राहणार आहे.
मैदानावर टी २० चा रेकॉर्ड
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने या मैदानावर सर्वाधिक ९२ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅकलमने या मैदानावर १ सामना खेळला असून,९१ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत भारतीय संघाचा लेफ्ट आर्म मध्यमगती गोलंदाज इरफान पठाणने सर्वाधिक ३ तसेच काईल मिल्स, जेम्स फ्रॅंकलीन युझवेंदर चहल आणि किमो पॉलने प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत.चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला काही षटके जलदगती गोलंदाजांना देखील मदत मिळू शकते. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ही भारताची १८२ इतकी राहिली आहे.
सलिल परांजपे, नाशिक