नवी दिल्ली | New Delhi
आयसीसी स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये दुबईत होत आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली होती. यात पाकिस्तानने ४९.४ षटकात सर्व गडी गमावून २४१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतापुढे (Team India) विजयासाठी २४२ धावांचे आव्हान आहे.
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात बाबर आझम आणि इमाम उल हकने केली. या दोघांनी मिळून ४१ धावा जोडल्या. त्यानंतर बाबर आझम २३ धावांवर माघारी परतला. बाबर बाद होताच इमाम उल हकही १० धावांवर धावबाद (Run Out) होऊन माघारी परतला. सुरुवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर सौद शकील आणि मोहम्म रिझवानने शानदार शतकी भागीदारी केली. सौद शकीलने ६२ धावा केल्या. तर रिझवान ४६ धावांवर माघारी परतला. शेवटी खुशदीलने काही आकर्षक फटके मारले आणि पाकिस्तानची धावसंख्या २४० पार पोहोचली.
दरम्यान, भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वाधिक ३ गडी बाद केले. यात त्याने ४० धावा खर्च केल्या. तर हार्दिक पंड्याने २, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.