मुंबई | Mumbai
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वनडे मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने वनडे संघाची घोषणा केली होती. पंरतु, भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केलेली नव्हती. यानंतर आता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेसाठी बीसीसीआयने कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवले आहे. तसेच या मालिकेसाठी मराठमोळ्या खेळाडूची देखील संघात एंन्ट्री झाली आहे.
मागील दीड वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. मात्र, दुखापतींतून सावरत त्याने एक शानदार शतक आणि अर्धशतक झळकावले होते.पहिल्या सामन्यात ऋतुराजने १२९ चेंडूमध्ये ११७ तर दुसऱ्या सामन्यात ८३ चेंडूंत नाबाद ६८ धावा केल्या होत्या. हे दोन्ही सामने जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देऊन गौरवण्यात आले होते.
शुभमन गिल मालिकेतून बाहेर
भारताच्या कसोटी आणि वन डे संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल (Shubhman Gill) कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या मानेत वेदना होत होत्या. यामुळे शुभमन गिल दुसऱ्या कसोटीला मुकला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला देखील तो मुकला आहे. त्यामुळे टी २० मालिकेपर्यंत तो बरा होऊन संघात परतणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत(यष्टीरक्षक) वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
मालिकेचे वेळापत्रक
३० नोव्हेंबर : पहिला एकदिवसीय सामना – रांची
०३ डिसेंबर : दुसरा एकदिवसीय सामना – रायपूर
०६ डिसेंबर : तिसरा एकदिवसीय सामना – विशाखापट्टणम




