दिल्ली | Delhi
आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 228 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा दुसरा सामना 16 तासांच्या आत श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. भारत या सामन्यात विजयी झाला तर फायनलमध्ये जागा पक्की होईल. तर सुपर 4 मधील चौथा संघ बांगलादेश फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असून नेट रनरेटमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. भारताने लंकेविरुद्ध विजय मिळवला तर भारताचे 2 सामन्यात 4 गुण होतील. तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे प्रत्येकी दोन गुण होतील. सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा 14 सप्टेंबरला सामना होणार आहे. तेव्हा ही लढत नॉकआऊट सारखी असेल.
सामना हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर जिंकणाऱ्या संघाला फायनलचे तिकिट मिळेल. आशिया कपची फायनल १७ सप्टेंबरला होणार आहे. पावसामुळे फायनलच्या सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 165 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 96 सामने जिंकले तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले. 11 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला.
सुपर-4 ची गुण तालिका
भारत – 1 सामना – 2 गुण, 4.560 नेट रनरेट
श्रीलंका – 1 सामना – 2 गुण, 0.420 नेट रनरेट
पाकिस्तान – 2 सामने – 2 गुण, -1.892 नेट रनरेट
बांगलादेश – 2 सामने – 0 गुण, -0.749 नेट रनरेट
दोन्ही संभाव्य प्लेइंग-11
संभाव्य प्लेइंग इलेव्हन टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन श्रीलंका : पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, कसून राजिता, मथिशा पाथिरना.