दिल्ली | Delhi
आशिया चषक 2023 मध्ये सुपर 4 फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मंगळवारी (12 सप्टेंबर) सामना खेळला गेला. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेले या सामन्यात भारतीय संघाने 214 धावांचा बचाव करत 41 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघासाठी कुलदीप यादव याने चार बळी मिळवले. श्रीलंकेसाठी युवा अष्टपैलू दुनिथ वेललागे याने एकाकी झुंज दिली. या विजयासह भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला.
प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्यानंतर भारताने श्रीलंकेचा डाव 41.3 षटकांत 172 धावांत आटोपला. भारताकडून कुलदीप यादवने 43 धावांत 4 बळी घेतले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने नाबाद 42 तर धनंजय डी सिल्वाने 41 धावा केल्या. या दोघांनी 7व्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या आशा वाढवल्या होत्या, मात्र जडेजाने धनंजया डी सिल्वाला बाद करून टीम इंडियाला साजेसा पुनरागमन केला. या विजयासह टीम इंडियाचे 4 गुण झाले असून आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा शानदार सुरुवात करून दिली. कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 53 धावांची जलद खेळी खेळली आणि शुभमन गिल (13) सोबत पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र गिलच्या रूपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसताच श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. वेलल्गेने आपल्या पहिल्या तीन षटकांत गिल, विराट कोहली (तीन धावा) आणि रोहित यांना बाद करून भारतीय संघाला बॅकफूटवर आणले.
पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुल (39) आणि इशान किशन (33) यांनी चौथ्या विकेटसाठी 89 चेंडूत 63 धावांची भागीदारी करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण वेलल्गेने राहुलला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर असलंकाने किशनला वॉक करत खालच्या फळीतील फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अक्षर पटेलने (26) मोहम्मद सिराजसोबत (नाबाद पाच) अखेरच्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी करत संघाला 213 धावांपर्यंत नेले.
टीम इंडियाने सुपर फोरमध्ये सलग दुसरा विजय नोंदवत आशिया कपच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. आता टीम इंडिया 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून अजून एक सामना बाकी आहे. टीम इंडिया 15 सप्टेंबरला बांगलादेशशी भिडणार आहे. हा सामना आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.