Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेश“मेरे प्यारे परिवारजनों... ते विरोधकांवर निशाणा”; ९० मिनिटांच्या भाषणात काय काय बोलले...

“मेरे प्यारे परिवारजनों… ते विरोधकांवर निशाणा”; ९० मिनिटांच्या भाषणात काय काय बोलले मोदी?

दिल्ली | Delhi

देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील युवकांना संदेशही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचे भाषण होते, त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते.

- Advertisement -

मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा

नेहमी मेरे प्यारे देशवासीयों…, असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करण्याऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात मेरे प्यारे परिवारजण असं म्हणत केली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलं. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी, अशी वारंवार मागणी केली. त्यानंतर आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर भाष्य केलं. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘विश्वकर्मा योजनेची’ घोषणा

पुढच्या महिन्यात देशभरात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. याच जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्वकर्मा योजने’ बाबतची माहिती दिली. तसेच, या नव्या योजनेची घोषणा त्यांनी लाल किल्ल्यावरून केली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही योजना देशात फर्निचर किंवा लाकडाचे काम करणाऱ्या, सलून चालवणाऱ्या, शूज बनवणाऱ्या आणि घरे बांधणाऱ्या गवंडींना आर्थिक मदत करणार आहे. तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकारकडून ही योजना सुरू करण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे सरकार 13 हजार ते 15 हजार कोटी रुपयांच्या वाटपासह ही योजना सुरू करेल, त्यामुळे या योजनेचा सर्वाधिक फायदा हा ओबीसी बांधवांना होईल.

गेल्या ७५ वर्षांत काही विकृती…

२०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षं साजरी करत असेल, तेव्हा भारत विकसित झाला असेल. हे मी देशाच्या सामर्थ्याच्या जोरावर म्हणतोय. सर्वात जास्त ३० हून कमी वयाच्या युवा शक्तीच्या जोरावर, महिलांच्या जोरावर म्हणत आहे. पण त्यामध्ये काही अडथळे आहेत. काही विकृती गेल्या ७५ वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत. आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत, की कधीकधी आपण डोळे बंद करून घेतो. पण आता डोळे बंद करण्याचा वेळ नाहीये. जर संकल्प पूर्ण करायचा असेल, तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

घराणेशाहीवरून विरोधकांना अप्रत्यक्ष टोला

यावेळी बोलताना मोदींनी घराणेशाहीवर टीका केली. आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष. त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा. घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते. त्यामुळे घराणेशाहीचं उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पुढील एक हजार वर्षांवर भाष्य

मी 1000 वर्षांपूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावलं उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या 1000 वर्षावर प्रभाव पडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

युवांचा देश भारत!

आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाहीय, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या 1000 वर्षाची दीशा निर्धारित करतील. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल. आता थांबायचं नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना काळात भारताने केली उत्तम कामगिरी

कोरोना काळात भारताने केलेली उत्तम कामगिरी जगाने पाहिली आहे. कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणे बदलली आहेत, आता भारताला संधी आहे, त्यामुळे ही संधी सोडायची नाही. तसेच, 2014 मध्ये भारत जगातील अर्थव्यवस्थेत 10 व्या स्थानावर होता. आज 9 वर्षानंतर भारत 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. परंतु आपल्याला येत्या 5 वर्षात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायचे असून ते आपण येत्या काळात करणार आहोत. त्याचप्रमाणे देशातील साडे तेरा कोटी जनता ही गरिबीतून मुक्त झाली असून ती विकासाच्या मार्गावर असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या