नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतात कसोटी क्रिकेट खेळताना भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा चांगलाच समाचार घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेश विरुध्द दोन कसोटी सामान्यांची मालिका खेळली ज्यात दुसऱ्या सामन्यात पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला व्हाईट वॉश दिला आहे. बांगलादेश विरुद्ध सीरिजमध्ये दमदार विजय मिळवल्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.
कानपूर येथे खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला. कसोटी मालिकेतील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बांगलादेशचा संघ ढेपाळला. भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी बांगलादेशने ९५ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने हे आव्हान १७.२ षटकामध्ये पूर्ण करत विजय मिळवला.
भारताचा बांगलादेश विरुध्द पहिला कसोटी सामना चेन्नई येथे खेळवण्यात आला. यात टीम इंडियाने बाजी मारून २८० धावांनी विजय मिळवला आणि सीरिजमध्ये १-० ने आघाडी मिळवली. तर, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सीरिजमधील दुसरा सामना २७ सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी या सामन्याला सुरुवात झाली खरी परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवसाचा खेळ वाया गेला.
भारतीय संघाला सामन्यातील चौथ्या दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ड्रॉ होणारा सामना जिंकण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा पाऊस पाडला आणि सर्वात वेगवान धावांचा रेकॉर्डब्रेक करत स्कोअरबोर्डवर ९ गडी बाद २८५ धावा लावल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ६८ आणि विराट कोहलीने ४७ धावांची खेळी केली.
दरम्यान, पहिल्या डावात २३३ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या बांगलादेशला दुसऱ्या डावात १४६ धावा करता आल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शदमन इस्लामने ५० धावांची खेळी केली. तर शेवटी मुशफिकुर रहीमने ३७ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या. १४६ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ९५ धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने शानदार खेळी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा