नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना मोठे दावे केले होते. मे महिन्यांत भारताबरोबर झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडल्याचा दावा शाहबाज शरीफ यांनी केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणावर भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी ‘राईट टू रिप्लाय’ वापरून पाकिस्तानला दहशतवादावरून घेरले.
शाहबाज शरीफ यांच्या भाषणावर भाष्य करताना भारतीय राजदूत पेटल गहलोत म्हणाल्या, “आज सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा हास्यास्पद विनोद पाहायला मिळाला, ज्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचे गौरव केले. तथापि, कितीही नाटक आणि खोटेपणा तथ्य लपवू शकत नाही. हा तोच पाकिस्तान आहे ज्याने २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना, द रेझिस्टन्स फ्रंटला भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडाच्या जबाबदारीपासून वाचवले.”
ओसामा बिन लादेनला दशकभर आश्रय दिला
पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांला आठवण करून दिली की पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देण्याचा दीर्घ इतिहास आहे. त्या म्हणाल्या की, “पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला एक दशक आपल्या देशात लपवून ठेवले होते, आणि जगाला दाखवण्यासाठी ते दहशतवादाविरुद्ध लढण्याचे नाटक करत राहिले. आता अलिकडेच एका पाकिस्तानी मंत्र्यांनी उघडपणे कबूल केले की त्यांच्या देशात दहशतवादी छावण्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत. २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा पाठिंबा असलेली ही संघटना जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे”, असेही पेटल गहलोत यांनी म्हटले.
“सत्य हे आहे की, भारतातील निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे आणि भारत नेहमीच आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलेल. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील आणि यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही” असंही पेटल गहलोत यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असा दावा केला की, मे महिन्यात भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडली. शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, “या वर्षी मे महिन्यात माझ्या देशाला पूर्वेकडून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवले”, असे शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या महासभेत बोलताना म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




