नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना फक्त तीन दिवसांतच संपला आणि तोही भारताच्या पराभवाने. कोलकात्याच्या हिरव्यागार ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला लोळवत २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना तिसऱ्या दिवशी संपणार हे पक्के होते, पण सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. पण पाहुण्या संघाने कमालीच्या कामगिरीसह १५ वर्षांनी टीम इंडियात कसोटी जिंकण्याची किमया केली. या विजयासह दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमा याने एकही कसोटी सामना न हारण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावा केल्यानंतर ऑलआऊट झाली, ज्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने १८९ धावा केल्या. ज्यात टीम इंडियाला केवळ ३० धावांची आघाडी मिळाली होती. अफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात १५३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ ९३ धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिकन संघाने ३० धावांनी विजय मिळवला आहे. आफ्रिकेसाठी फिरकीपटू हार्मरने या सामन्यात एकूण ८ बळी घेतले. कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या १२४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातच निराशाजनक झाली. यशस्वी जैस्वाल ४ चेंडूचा सामना करुन खातेही न उघडता माघारी फिरला. के एल राहुलही केवळ एक धावेची भर घालून माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने ९२ चेंडूत केलेल्या ३१ धावा, अक्षर पटेल २६ (१७), रवींद्र जडेजा १८ (२६) आणि ध्रुव जुरेल १३ (३४) धावा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाढता आला नाही.
दरम्यान, भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी माऱ्यासमोर लोटांगण घातले. अफ्रिकन संघाकडून सायमन हार्मर दोन्ही डाव मिळून ८ बळी घेतले. केशव महाराज आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी २-२ तर मार्करमन एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने एकमेव अर्धशतक झळकावले. घरच्या मैदानात भारतीय खेळाडूंकडून एकही अर्धशतक पाहायला मिळाले नाही.
टेम्बा बावुमाची कौतुकास्पद कामगिरी
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या आणि दुसऱ्या डावातही तुफानी मारा करत आफ्रिकेचा कणा मोडला. केवळ ९१ धावांपर्यंत पोहोचतानाच दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स गमावल्या होत्या. रवींद्र जाडेजाने एडेन मार्करम (4), वियान मुल्डर (11), टोनी डी झोरजी (2) आणि ट्रिस्टन स्टब्स (5) यांना बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनीही जाडेजाला उत्तम साथ दिली.
पण, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याचे कौतुक करावे लागेल. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात त्याने जबरदस्त खेळ खेळला. तिसऱ्या दिवशीही त्याने आपली झुंज कायम ठेवली. कॉर्बिन बॉश (25) याच्या सोबतीने आठव्या विकेटसाठी ४४ धावांची महत्त्वाची भागीदारी उभी केली. शेवटी, दक्षिण आफ्रिकेची अखेरची दोन विकेट मोहम्मद सिराजने घेतल्या. बावुमाने १३६ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ५५ धावा करत जिद्दीची खेळी साकारली. भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




