Sunday, February 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजInd vs Pak T20 World Cup : कोलंबोत आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान...

Ind vs Pak T20 World Cup : कोलंबोत आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी (दि.१५) भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs Pak) हाय व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता कोलंबो येथील आर. प्रेमदासा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान संघाचे कर्णधारपद अष्टपैलू सलमान अली आघाकडे तर सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असणार आहे.

- Advertisement -

आयसीसी टी-२० विश्वचषक (ICC T 20 World Cup) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताविरुद्ध सामना खेळणार नसल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली होती. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम होता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे पाकिस्तानने अखेर शरणागती पत्करली आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

YouTube video player

भारत विरुद्ध पाकिस्तान संघ जेव्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकतात तेव्हा दोन्ही संघ सामना (Match) जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतात. भारत आणि पाकिस्तान संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. दोन्ही संघांनी आपल्या दोन्ही सामन्यात विजय संपादन केला असल्यामुळे एक चुरशीची लढत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने अमेरिका विरुद्ध २९ धावांनी तर नामिबिया विरुद्ध ९३ धावांनी विजय मिळवला आहे.

दुसरीकडे पाकिस्तान संघाने नेदरलँड्स विरुद्ध तीन गडी राखून तसेच अमेरिका विरुद्ध ३२ धावांनी विजय संपादन केला आहे. सुपर-८ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये ८ सामने खेळले असून, भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा राहिला आहे. भारतीय संघाने ७-१ ने सरशी साधली आहे. तसेच अखेरच्या पाच सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.

हस्तांदोलनावरून शाब्दिक युद्ध

कोण हस्तांदोलन करतो आणि कोण नाही, याने आम्हाला फरक पडत नाही. आम्ही येथे क्रिकेट खेळायला आलो आहोत. ज्यांनी हस्तांदोलन केले नाही, त्यांना आम्ही उद्या मैदानावरच आमच्या कामगिरीने उत्तर देऊ.

सलमान आगा, कर्णधार, पाकिस्तान

कोण काय बोलतंय याकडे आमचं लक्ष नाही. आशिया कपमध्ये काय झाले ते जुने झाले. आता २४ तासांनंतर जे काही होईल ते सर्वांना दिसेलच. आम्ही मैदानात आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहोत.

सूर्यकुमार यादव, कर्णधार, भारत

प्रमुख खेळाडू : सूर्यकुमार यादव, शाहिन आफ्रिदी, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या

ताज्या बातम्या

राज-का-रण : राष्ट्रवादीतील निर्नायकी!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादी या पक्षाचे काय होणार, दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार का, या प्रश्नांची उत्तरे...