दिल्ली । Delhi
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. काल (28 सप्टेंबर) झालेल्या या रोमांचक लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत टीम इंडियाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारत विजेतेपद पटकावले. तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारा विजय साकार झाला आणि भारताने आशिया चषकावर आपली छाप उमटवली.
मात्र सामन्याइतकाच नाट्यमय क्षण पारितोषिक वितरण सोहळ्यात पाहायला मिळाला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सामन्यानंतरचा सोहळा तासाभराहून अधिक वेळ लांबला आणि या निर्णयामुळे जगभरात चर्चेला उधाण आले.
भारतीय संघाने घेतलेल्या या भूमिकेबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टीकरण दिले. “आपल्या देशाविरुद्ध युद्ध छेडणाऱ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारणे शक्य नाही,” असे ते म्हणाले. सैकिया यांनी पुढे स्पष्ट केले की, “याचा अर्थ असा नाही की ती ट्रॉफी किंवा पदकं त्या व्यक्तीने आपल्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जावीत. हा प्रसंग पूर्णपणे अनपेक्षित आहे.”
दरम्यान, भारतीय संघाने अंतिम सामन्यानंतर सेलिब्रेशन केले, मात्र ट्रॉफी स्वीकारण्यास नकार कायम ठेवला. मोहसीन नक्वी वारंवार ट्रॉफी देण्यासाठी आग्रही होते, तरी भारतीय खेळाडू ठाम राहिले. अखेरीस नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेले. या प्रसंगामुळे आशिया चषकाची ट्रॉफी मैदानावर न उचलताच भारताने विजय साजरा केला.
यापूर्वीही भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध ठाम भूमिका घेतली होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. फायनलपूर्वी नाणेफेकीच्या वेळी फोटोसेशनलाही भारतीय खेळाडूंनी दुरावलेले राहणे पसंत केले. त्यामागे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते. या घटनेत भारतीय पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते.
भारताच्या विजयाइतकाच ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णयही आता चर्चेचा विषय बनला आहे. क्रीडा क्षेत्रात क्वचितच अशा प्रकारच्या भूमिका पाहायला मिळतात. मात्र भारतीय संघाच्या या निर्णयामुळे क्रीडांगणाबरोबरच राजकीय संदर्भही पुढे आले आहेत.
भारतीय संघाच्या या पराक्रमाने चाहत्यांना अभिमान वाटत असताना, ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळं उदाहरण घालून दिलं आहे. आता पुढे या विषयावर एसीसी आणि बीसीसीआय यांची अधिकृत भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




