दिल्ली । Delhi
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. इराणच्या राजधानीत असलेल्या भारतीय नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत तेहरान शहर तातडीने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय नागरिक असून, यामध्ये १५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इराणमधील घातक घडामोडी लक्षात घेता, भारत सरकारने या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करत सांगितले की, तेहरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्हिसावर वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीयांनी शहर तातडीने सोडावे. इराणमधील भारतीय दूतावासाने देखील स्थानिक भारतीय नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे आणि विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
या निर्णयाचे कारण म्हणजे इराणने तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार अत्यंत जागरूक आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. विशेषत: शाहिद बेहेश्ती मेडिकल सायन्सेस विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
दूतावासाच्या सूचनेनुसार, सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ९:३० पर्यंत वेलेंजाक विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर उपस्थित राहावे. येथून सकाळी १० वाजता कोम शहराच्या दिशेने बसेस रवाना होतील. या आदेशात वसतिगृहांमध्ये व तसेच खाजगी अपार्टमेंटमध्ये राहणारे विद्यार्थीही समाविष्ट आहेत. दूतावासाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणताही भारतीय विद्यार्थी स्थानिक वसतिगृह किंवा अपार्टमेंटमध्ये थांबू नये. हे निर्देश व्यापक स्वरूपात सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने २४ तास कार्यरत असलेली हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासानेही रविवारी सांगितले की, सध्या तेथील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. तरीही कोणतीही जोखीम न घेता, अनावश्यक प्रवास किंवा हलचाल टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे की, “तेहरानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. आम्ही इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कात असून त्यांना शक्य तितक्या लवकर सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” इराण सरकारकडूनही भारत सरकारकडे सर्व भारतीयांची यादी मागवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधील बहुतांश विमानतळ बंद करण्यात आले आहेत. मात्र, जमिनीच्या सीमांद्वारे स्थलांतर शक्य असल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी भारताला कळवले आहे.
भारत सरकार आणि भारतीय दूतावास दोघेही इराण व इस्रायलमधील परिस्थितीवर सतत बारीक लक्ष ठेवून आहेत. दूतावासाने नागरिकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आणि अधिकृत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणत्याही अडचणीत भारतीय नागरिकांनी तातडीने भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




