मुंबई | Mumbai
आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेत आज शुक्रवारी (दि.१५) रोजी भारताचा सामना बांगलादेश (IND vs BAN) संघाशी होणार आहे. हा सामना आर के प्रेमदासा कोलंबो येथे होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. भारताचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) तर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे…
विशेष म्हणजे आशिया चषक २०२३ मध्ये दोन्ही संघांमध्ये प्रथमच सामना होणार असून हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. तर हा सामना बांगलादेशसाठी निव्वळ एक औपचारिकता असणार आहे. तसेच या सामन्यात विजय संपादन करून आशिया चषक स्पर्धेत विजयी शेवट करण्यासाठी बांगलादेश (Bangladesh) मैदानात उतरणार आहे. बांगलादेशला सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने पराभूत केले आहे. तर भारतीय संघाने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये आत्मविश्वासाने उतरण्यासाठी भारतीय संघाचा (Indian Team) प्रयत्न असणार आहे.
भारतासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ईशान किशन, यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला पहिल्या विकेटसाठी ८०-० अशी आकर्षक सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे भारत-श्रीलंका संघाविरुद्ध मोठी धावसंख्या सहज उभारणार असे वाटत होते. पण भारतीय संघाच्या सर्व फलंदाजांनी विलालगे आणि चरीत असलंका या श्रीलंकेच्या (Sri Lanka) फिरकी गोलंदाजांपुढे अक्षरशः गुडघे टेकले. त्यामुळे संघाला सर्व बाद २१३ धावांपर्यंत मजल मारता आली.
त्यानंतर भारतीय संघाच्या सर्व गोलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध अचूक टप्प्यावर मारा करत निर्णायक क्षणी विकेट घेतल्या. त्यामुळे भारताचा विजय सुकर झाला. मात्र शार्दूल ठाकूरच्या बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळालेल्या अक्षर पटलेला गोलंदाजीमधे काही कमाल करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुध्द फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर भारतीय संघाला कडवी लढत देण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.