दिल्ली | Delhi
नेपाळचा दारुण पराभव करत भारतीय संघाने आशिया कपमधील सुपर ४ संघांच्या यादीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघ यापूर्वीच सुपर ४ मध्ये पोहचला आहे. त्यामुळं आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रंगतदार सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पल्लिकल येथील मैदानावर भारत-पाकमधील सामना मुसळधार पावसामुळं रद्द झाला होता. त्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. गट अ च्या गुणतालिकेत पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळं आता येत्या १० सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा साखळी सामना खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे खेळवला जाईल सामना?
आशिया कप २०२३ चे सुपर४ सामने ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. आशिया कप २०२३ च्या वेळापत्रकानुसार A1 आणि A2 मधील सामना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानी संघाचा सामना १० सप्टेंबर रोजी दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाशी होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.