दिल्ली । दिल्ली
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत असताना, काही भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, राजधानी दिल्ली-एनसीआरसह काही भागांत पावसाने दांडी मारल्याने दमट उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने २८ जुलैसाठी हवामान अंदाज जाहीर करत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे दमट उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. लक्ष्मी नगर, रोहिणी, नरेला, पीतमपुरा, बदली, मुंडका, पश्चिम विहार आणि पंजाबी बागसह दिल्लीच्या अनेक भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
हवामान खात्याने पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. जयपूर, सिरोही, जालोर, राजसमंद, अजमेर, श्रीगंगानगर, झुंझुनू, पाली, नागौर, बिकानेर, जोधपूर, चुरू, सीकर आणि भीलवाडा यासारख्या शहरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. कन्नौज, हरदोई, कानपूर देहाट, सीतापूर, खेरी, झांसी, जालौन, हमीरपूर, सिद्धार्थनगर, सहारनपूर, बिजनौर, मेरठ, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, संभल, बरेली, पिलीभीत, हापूर आणि रामपूर येथे जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, मध्य महाराष्ट्र, किनारी आणि दक्षिण कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम गुजरात, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने नागरिकांना पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागात पूर, वीज पडणे आणि रस्ते बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील हवामानातील बदलांमुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.




