नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलने फर्स्ट क्लास अर्थात लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी चहलने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळण्याचे स्वप्न त्याने अनेक वर्षे मनात जपले होते; मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली. विशेष म्हणजे, चहलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नसून वनडे आणि टी-२०मध्ये भारतात पुनरागमन करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
चहलने सांगितले की, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हे त्याचे कायमचे स्वप्न होते. तो म्हणाला की, त्याने अनेक वर्षे हे स्वप्न मनात जपले होते. मात्र, अखेर ते पूर्ण होऊ शकले नाही. चहलचा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्याचा उल्लेख करताना तो भावूक झाला. कसोटी संघात स्थान मिळवता आले नाही, याची खंत असली तरी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये युझवेंद्र चहने ४९ सामन्यांच्या ७९ डावात १४८ बळी टिपले आहेत. त्यात सहा वेळा त्याने डावात पाच बळी टिपण्याची किमया साधली. तर एका डावात ४ बळी टिपण्याचा पराक्रम त्याने ८ वेळा केला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ४४ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर ९९ धावांत ९ बळी ही त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
2026 च्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 मध्ये त्याने 16.14 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या. त्याचा अखेरचा प्रथम-श्रेणी सामना मिडलसेक्सविरुद्ध झाला. या सामन्यात मिडलसेक्सने नॉर्थम्प्टनशायरचा सात विकेट्सनी पराभव केला.
चहल अजूनही व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे आणि सध्या पंजाब किंग्सकडून खेळतो. विशेष म्हणजे, हरियाणासाठी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही चहल सातत्याने खेळला नाही. त्याने अखेरच्या वेळी 2016-17 रणजी ट्रॉफी हंगामात दोनपेक्षा जास्त सामने खेळले होते. त्या हंगामात सात सामन्यांत त्याने 22.60च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या होत्या.




